spot_img

Sanjay Raut : अदनान सामीच्या उपस्थितीवरून राष्ट्रभक्तीवर प्रश्न; संघ-भाजप ढोंगी असल्याचा राऊतांचा आरोप

spot_img

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मात्र, प्रसिद्ध गायक अदनान सामी यांच्या उपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अदनान सामीच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत संघाच्या राष्ट्रभक्तीवरच सवाल उपस्थित केला. अदनान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तान हवाई दलात अधिकारी होते आणि १९६५ च्या भारत-पाक युद्धात त्यांनी भारतावर हल्ले केल्याचा आरोप राऊत यांनी केला. अशा व्यक्तीचा मुलगा सरसंघचालकांसोबत बसून कार्यक्रमात सहभागी होतो, हे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले.

या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी संघ आणि भाजपला ढोंगी आणि पाखंडी ठरवत, “तुम्ही देशाला कोणते आदर्श देत आहात?” असा थेट सवाल केला. ज्यांच्या कुटुंबीयांचा भारताविरोधात इतिहास आहे, त्यांच्यासोबत व्यासपीठ सामायिक करणे हे संघाच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे राऊत म्हणाले.

इतकेच नव्हे, तर भाजपच्या सत्ताकाळावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. संघ आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून संघाच्या पाठबळावर भाजप सत्तेत आले, मात्र देशाची स्थिती ढासळली असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत अमेरिकेच्या प्रभावाखाली गेला असून याची जबाबदारी संघ नेतृत्वाने स्वीकारावी, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात काही आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेल्या व्यक्तींची उपस्थितीही संशयास्पद असल्याचे सांगत, संघ पापांवर पांघरुण घालत आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

उल्लेखनीय म्हणजे, संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाचा उद्देश संघाच्या शतकभराच्या कार्याचा आढावा घेणे आणि भविष्यातील दिशा ठरवणे हा होता. मात्र, आता हा सोहळा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ