संजय राऊत म्हणाले “बाळासाहेब ठाकरे नसते थांबले, तर भाजपाला तेव्हा ‘कुबड्या’ काय असतात हे कळले असते; आज शिंदे-पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे”
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बाबरी मशिद प्रकरणानंतर देशभरात बाळासाहेब ठाकरे यांची लाट होती, पण तेव्हा भाजप ओळखलेही जात नव्हते, असा टोला राऊत यांनी लगावला. त्यांनी म्हटले की, “त्या काळात बाळासाहेबांच्या आदेशावर आम्ही हिंदुत्वासाठी काम केलं. अटलजी आणि अडवाणी यांनी बाळासाहेबांना विनंती केली होती तुम्ही निवडणुका लढवू नका, नाहीतर भाजपाचं नुकसान होईल. तेव्हा बाळासाहेबांनी क्षणाचाही विलंब न करता मागे घेतलं. आज जे ‘कुबड्या’ बोलतात, त्यांनी तेव्हा ती ताकद पाहिली असती तर त्यांना ‘कुबड्या’ म्हणजे काय ते कळलं असतं.”
अमित शाहांच्या ‘कुबड्या’ या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “अमित शाह राजकारणात उशिरा आले. ते राजकारणाला समाजकारण नव्हे, तर व्यापार मानतात. त्यांनी भाजपात व्यापारी मानसिकतेची पिढी निर्माण केली आहे. त्यामुळेच ते सत्तेसाठी काहीही करतात.”
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “स्वाभिमान असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. आम्ही जरी सत्तेत आलो तरी विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवू. आम्ही त्यांच्या व्होटचोरीला आळा घालतोय, त्यामुळेच त्यांना पराभव दिसतोय.”




