मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर (Mayor) बसणार तर शिवसेनेकडे मात्र उपमहापौरपद देण्यात आलं आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उपमहापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेनेने या पदासाठी संजय शंकर घाडी (Sanjay Ghadi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हे उपमहापौर पद सवा वर्षाच्या कालावधीसाठी असेल. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नगरसेवकांना या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संजय घाडी हे शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील.
मुंबई महानगरपालिकेच्या निकालात भाजपने ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. आता शिवसेनेच्या (शिंदे गट) २९ जागांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा आकडा बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. या सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार, महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे (शिंदे गट) राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.




