spot_img

Sangli IPS Officer UPSC Exam : आटपाडी तालुक्यातील पहिला IPS अधिकारी; प्रवीण कोळपेची हत्तीवरून भव्य मिरवणूक

spot_img

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 584 वी रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. आटपाडी तालुक्यातील पहिला IPS अधिकारी होण्याचा मान त्याने मिळवला असून या यशाचा आनंद गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रवीण कोळपेची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढत नागरिकांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या प्रवीण कोळपे यांच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती आणि लहानपणीच वडिलांचे छत्रही हरपले होते. मात्र या सर्व अडचणींना न जुमानता त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर UPSC परीक्षेत यश मिळवले.

या यशानिमित्त आटपाडी शहरात खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रवीण कोळपे यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. आटपाडी बसस्थानकापासून पोलिस स्टेशन चौकापर्यंत बाजारपेठेतून ही मिरवणूक पार पडली. या वेळी आमदार पडळकर यांनी स्वतः हातात बादली घेऊन बाजारपेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांना साखर वाटत आनंद व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अनेक तरुण आपल्या अपयशासाठी परिस्थिती किंवा पालकांना दोष देतात. मात्र प्रवीण कोळपे यांनी कठीण परिस्थितीतही जिद्दीने यश मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. बहुजन समाजातील तरुणांनीही अशा यशाकडे प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहावे आणि आयएएस-आयपीएस होण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ