घराला आग लागल्यानंतर अंकिता लोखंडे–विकी जैन यांनी दिला आधार, 40 जणांची सुखरूप सुटका
मुंबईतील (Mumbai) अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये गुरुवार, 25 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. 23 मजली या इमारतीच्या 12, 13 आणि 14 व्या मजल्यांवर ही आग पसरली असून, त्यामुळे संपूर्ण इमारतीत प्रचंड धुराचे लोट पसरले होते.
या इमारतीच्या 14 व्या मजल्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता संदीप सिंह (Sandeep Singh) यांचे निवासस्थान असून, त्यांच्या घरालाही आगीचा फटका बसला. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत संदीप सिंह पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
आग लागल्यानंतर इमारतीतील अनेक रहिवाशी धुरामुळे अडकले होते. अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत पायऱ्यांच्या मदतीने तब्बल 40 जणांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती.
आगीच्या घटनेनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचे पती विकी जैन (Vicky Jain) यांनी संदीप सिंह (Sandeep Singh) यांना आपल्या घरी आसरा दिला. त्यांचे एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून दिलासादायक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, संदीप सिंह यांच्यावर काही दिवसांपूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीय व मित्रपरिवार चिंतेत होता. मात्र आता त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत असून, सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पत्रकारितेतून कारकीर्द सुरू करणारे संदीप सिंह यांनी पुढे चित्रपटसृष्टीत यशस्वी वाटचाल केली. ‘मैरी कॉम’, ‘सरबजीत’, ‘अलीगड’, ‘झुंड’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘सफेद’ आणि आगामी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगीच्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.




