spot_img

Sandeep Deshpande : मनसे सोडण्याच्या अफवांवर संदीप देशपांडेंचं ठाम उत्तर – “मी कुठेही जाणार नाही”

spot_img

संतोष धुरींच्या आरोपांनंतर देशपांडेंनी स्पष्ट केली भूमिका, अफवा पसरवू नका अशी माध्यमांना विनंती

मनसे नेते संदीप देशपांडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना अलीकडेच उधाण आलं होतं. या चर्चांमागे मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांचे आरोप कारणीभूत ठरले होते. मात्र या सर्व अफवांना संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलं आहे.

माध्यमांशी बोलताना देशपांडे म्हणाले की, आपण कुठेही गेलेलो नाही आणि मनसेचं काम प्रामाणिकपणे करत आहोत. “मी मनसेचाच आहे आणि मनसेसाठीच काम करत राहणार आहे. अशा प्रकारच्या निराधार चर्चा पसरवू नका,” अशी हात जोडून विनंती त्यांनी केली. महापालिका निवडणुकीत मनसेच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी आपण मुंबई अध्यक्ष म्हणून पूर्ण ताकदीनं काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

संतोष धुरी यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, त्यांना धुरी नेमकं काय म्हणाले हे माहिती नाही. “प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टीकोन असतो. ते त्यांच्या भूमिकेतून बोलत आहेत, मी माझ्या भूमिकेतून काम करत आहे,” असं ते म्हणाले.

पक्षातील संधींबाबत आठवण करून देताना देशपांडे म्हणाले की, २०१२ मध्ये अनेक इच्छुक असतानाही पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली होती. “ठाकरे हे नाव नसून तो एक विचार आहे,” असं सांगत त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात पहिल्यांदाच झालेल्या युतीवरही भाष्य केलं. जागावाटपाच्या प्रक्रियेत सर्वांना समान संधी मिळत नाही, मात्र त्याबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाळा नांदगावकरांवर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचं टाळत देशपांडे म्हणाले की, संतोष धुरी यांनी घेतलेल्या निर्णयाचा योग्य-अयोग्यपणा येणारा काळच ठरवेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ