spot_img

Sandeep Deshpande : आरोग्य विभागाचा ‘महाघोटाळा’ उघड? १० लाखांचे एक्स-रे मशीन चक्क ६१ लाखांना! मनसे नेते संदीप देशपांडे यांचा गंभीर आरोप

spot_img

तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या कार्यकाळातील व्यवहारांवर संशयाची सुई

महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण सध्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुराव्यांसह समोर येत आरोग्य विभागाच्या निविदा प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा केला आहे. बाजारभावाप्रमाणे ज्या पोर्टेबल एक्स-रे मशीनची किंमत साधारण १० लाख रुपये आहे, तीच मशिन सरकारने प्रति नग ६१ लाख २० हजार रुपयांना खरेदी केली आहे. अशा ८० मशिन्सच्या खरेदीत शासनाने तब्बल सहा पट अधिक दर मोजून सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

या निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगत देशपांडे यांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले आहेत. मूळ उत्पादक कंपन्यांना डावलून केवळ ठराविक वितरकांना (Distributors) झुकते माप का दिले गेले, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बंदी किंवा निर्बंध असतानाही नियमांची पायमल्ली करून खरेदी कशी करण्यात आली, यावरही त्यांनी बोट ठेवले आहे. ‘मिडी एक्स’ आणि ‘श्रद्धा डिस्ट्रीब्यूटर’ सारख्या कंपन्यांना कंत्राट देताना स्वदेशी उत्पादकांना का बाद करण्यात आले, हा आता चौकशीचा मुख्य विषय ठरला आहे.

संदीप देशपांडे यांनी थेट तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या कार्यकाळातील या व्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी करण्याची मागणी केली आहे. “एकीकडे आरोग्य सुविधांसाठी बजेट नसल्याचे रडगाणे गायले जाते आणि दुसरीकडे जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी केली जाते,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, अशा १४ यंत्रसामग्री खरेदीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा करत, येत्या काही दिवसांत दररोज एक याप्रमाणे आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची ‘कच्ची चिठ्ठी’ उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ