सोशल मीडियावरील अफवा, आरोप आणि टीकेवर गायक सलील कुलकर्णींची खणखणीत प्रतिक्रिया; नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया समोर
क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्न पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर अफवा आणि टीकांचा पूर आला आहे. लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यानंतर स्मृतीने तातडीने लग्न थांबवण्याचा निर्णय घेत सर्व लग्नासंबंधी पोस्ट्स इन्स्टाग्रामवरून हटवल्या.
दरम्यान, कोरिओग्राफर मेरी डिकोस्टा आणि पलाश यांच्यातील चॅट्स व्हायरल होताच पलाशवर फसवणुकीचे आरोप सुरू झाले आणि संपूर्ण प्रकरणाभोवती नवे कयास लावले जाऊ लागले.
या वाढत्या गोंधळावर प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी कठोर भूमिका घेत लोकांना आरसा दाखवला. त्यांनी विचारलं “स्मृतीच्या जागी आपल्या घरातील मुलगी किंवा बहीण असती, तर आपण याच पद्धतीने चर्चा केली असती का? कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य, नाती किंवा संकट हे इतकं सहजगत्या चर्चेचा विषय कसं होतं? माहिती नसताना अफवा पसरवण्याची घाई आपण का करतो?” ते पुढे म्हणाले “जरा दयाळू बना, समजूतदार बना. एखाद्या कुटुंबावर कठीण प्रसंग आला असताना आपणच त्यांच्या वेदना वाढवत आहोत. सोशल मीडियावर आधी कळलं म्हणून नेमकं कोणतं यश मिळतं?”
सलील कुलकर्णींच्या (Saleel Kulkarni) या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाच्या आहेत. काहींनी त्यांची भूमिका समर्थित करत – “स्मृती देशाची मुलगी आहे, तिच्याबाबत संवेदनशील राहायलाच हवं,” असं म्हटलं. तर काहींनी उलटपक्षी, “प्रायव्हेट आयुष्य त्यांनीच सोशल मीडियावर आणलं, त्यामुळे लोक प्रतिक्रिया देणारच,” असा विरोधी सूर लावला. या संपूर्ण प्रकरणामुळे स्मृती–पलाश लग्नसोहळा अजूनही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.




