खासगी आयुष्यात डोकावणाऱ्या प्रश्नामागे उत्सुकता, तुलना की करिअरचा अंदाज?
आपल्या ओळखीतील काही लोकांना नको त्या चौकशा करण्याची सवय असते. सुरुवातीला तब्येतीची, कामाची साधी विचारपूस होते आणि अचानक चर्चा वळते थेट खासगी आयुष्याकडे. त्यातही “पगार किती?” हा प्रश्न इतक्या सहजपणे विचारला जातो की अनेकजण नाईलाजाने आकडा सांगून मोकळे होतात. मात्र, प्रत्यक्षात कोणाच्या पगाराबद्दल थेट विचारणे हे असभ्यतेचे लक्षण मानले जाते. तरीही असा प्रश्न वारंवार का विचारला जातो, यामागे काही ठराविक कारणे असतात.
पगाराबद्दल चौकशी करण्यामागची कारणे
पहिले कारण – राहणीमानातील फरक
तुमचे कपडे, गाडी, घर किंवा एकूणच लाईफस्टाइल समोरच्यापेक्षा अधिक अपडेटेड दिसत असेल, तर समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रश्न निर्माण होतात. “एवढं सगळं परवडतं कसं?” या उत्सुकतेपोटी तुमच्या उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी पगाराची विचारणा केली जाते.
दुसरे कारण – सामाजिक स्तराचा अंदाज
पैसा आल्यावर व्यक्तीचा सामाजिक वर्तुळही बदलतो. मोठ्या लोकांशी उठबस वाढते. त्यामुळे तुमचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा ओळखण्यासाठी अनेकजण पगाराबद्दल विचारतात.
तिसरे कारण – करिअरविषयी कुतूहल
तुमचे राहणीमान आणि आर्थिक स्थैर्य पाहून तुम्ही नेमकं काय काम करता, कुठल्या क्षेत्रातून कमाई करता, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यासाठी पगार हा मोजमापाचा सोपा मार्ग मानला जातो.
पगार विचारला तर उत्तर कसं द्यायचं?
जर कोणी पगाराबद्दल विचारले, तर थेट महिन्याचा आकडा सांगण्याऐवजी वार्षिक पॅकेज (CTC) सांगणे अधिक सुरक्षित ठरते. पगार जास्त असेल, तर तुमच्या कामाचे महत्त्व आणि जबाबदाऱ्या सांगून तो आकडा मांडू शकता. यामुळे समोरच्याला तुमच्या पदाची किंमत कळते आणि प्रेरणाही मिळू शकते.
पगार कमी असेल, तरीही वार्षिक पॅकेजचा उल्लेख करणे फायद्याचे ठरते. कारण त्यात CTC, बोनस, इतर सुविधा यांचा समावेश असतो आणि आकडा तुलनेने मोठा वाटतो. आजही समाजात पगारावरून व्यक्तीचा दर्जा मोजला जातो, हे वास्तव आहे.
स्मार्ट उत्तर हा उत्तम पर्याय
जर तुम्हाला पगाराचा आकडा सांगण्यात अजिबात रस नसेल, तर स्मार्ट उत्तर तयार ठेवा. उदाहरणार्थ, “माझ्या कामाच्या तुलनेत समाधानकारक पगार मिळतोय” किंवा “पुढील काळात पगार वाढवण्यासाठी मी स्वतःवर काम करत आहे”. अशा उत्तरांमुळे समोरच्याला संकेत मिळतो की तुम्हाला या विषयावर चर्चा करायची नाही — आणि विषय तिथेच थांबतो.




