चमकदार रंग की रसायनांचा फास? खरेदीपूर्वी ‘या’ ४ सोप्या चाचण्या नक्की करा; सुरक्षित होळीसाठी खास टिप्स**
अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. यंदा ४ मार्च २०२६ रोजी होळी (धुलिवंदन) साजरी केली जाणार आहे. बाजारात रंगांची दुकानं सजली असून ‘हर्बल’ आणि ‘नॅचरल’ नावाचा मोठा गाजावाजा होत आहे. मात्र, नैसर्गिक रंगांच्या नावाखाली केमिकलयुक्त रंगांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रासायनिक रंग त्वचा, डोळे आणि फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
तुमचा रंग ‘सेफ’ आहे की ‘केमिकल’, हे ओळखण्यासाठी खालील सोप्या ट्रिक्स वापरा:
१. पॅकेटवरील माहितीची ‘स्कॅनिंग’ करा
रंग खरेदी करण्यापूर्वी केवळ आकर्षक वेष्टन पाहू नका. पॅकेटवर घटकांची यादी (Ingredients List), उत्पादकाचा पत्ता आणि ‘एक्सपायरी डेट’ तपासा. जर त्यावर घटकांची माहिती नसेल किंवा फक्त ‘नैसर्गिक’ असा ढोबळ उल्लेख असेल, तर सावध राहा.
२. रंगाची ‘चमक’ तपासा
नैसर्गिक रंग हे फळं, फुलं आणि झाडांच्या पानांपासून बनवलेले असतात, त्यामुळे ते थोडे फिकट आणि मॅट (Matte) स्वरूपाचे असतात. याउलट, रासायनिक रंगात काचेची पावडर किंवा ॲल्युमिनियम असते, ज्यामुळे ते अतिशय चमकदार आणि गडद दिसतात. जर गुलाल खूपच चमकत असेल, तर त्यात केमिकल असण्याची दाट शक्यता असते.
३. ‘पॅच टेस्ट’ आणि पाण्याचा वापर
थोड्या प्रमाणात रंग हातावर लावून तो पाण्याने धुवून पाहा.
पाण्याने धुतल्यावर लगेच निघून जातो आणि त्वचेवर डाग पडत नाहीत. हा रंग धुतल्यानंतरही त्वचेवर आपला ठसा (Stain) सोडतो, जो सहजासहजी निघत नाही.
४. हातावर चोळून पाहा (Texture Test)
रंग हाताच्या तळव्यावर घेऊन थोडा चोळा. जर तुम्हाला त्यात खरखरीतपणा किंवा टोचल्यासारखे वाटले, तर समजा त्यात वाळू, सिमेंट किंवा काचेचे बारीक कण मिसळले आहेत. अस्सल हर्बल गुलाल हा पिठासारखा मऊ असतो.
डॉक्टरांचा सल्ला: रंग खेळायला जाण्यापूर्वी संपूर्ण अंगाला आणि केसांना खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल लावा. यामुळे त्वचेवर एक संरक्षक थर तयार होतो आणि केमिकलचा थेट संपर्क टळतो.




