spot_img

Sadhvi Prem Passed Away : जोधपूरमध्ये साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू; मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल ‘सुसाईड पोस्ट’मुळे प्रकरणाला नवे वळण

spot_img

ट्रोलिंग, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाच्या आरोपांमुळे वातावरण तापले; आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचा संशय

जोधपूरमधून एक धक्कादायक आणि भावनिक घटना समोर आली असून सनातन धर्माच्या प्रचारक साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तब्बल चार तासांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक कथित सुसाईड नोट पोस्ट झाल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाचे गंभीर मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत.

साध्वी प्रेम बैसा या काही काळापासून सोशल मीडियावर सक्रिय होत्या. त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या वडिलांविषयी चुकीचा मजकूर एडिट करून पसरवण्यात आल्याचा आरोप साध्वींनी केला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिस कारवाईनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आणि नंतर त्याच्या कुटुंबीयांनी साध्वींची माफीही मागितली होती. त्या वेळी साध्वींनी उदार भूमिका घेत आरोपीला माफ केले होते.

मात्र आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा तोच व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे साध्वींना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. सततच्या टीका, अपमानास्पद कमेंट्स आणि मानसिक दबावामुळे त्या प्रचंड तणावात होत्या, असा दावा समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मृत्यूनंतर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट झालेल्या संदेशात त्यांनी आपल्या आयुष्याचा उल्लेख करत, “मी शेवटच्या श्वासापर्यंत सनातन धर्मासाठी जगले,” असे भावनिक शब्द लिहिले होते. तसेच त्यांनी न्यायासाठी अनेक संत, ऋषी आणि धर्मगुरूंना विनंती केल्याचा उल्लेखही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र ही पोस्ट आधीच शेड्यूल करून ठेवली होती का आणि मृत्यूनंतर ती आपोआप अपलोड झाली का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, साध्वींच्या मृत्यूनंतर आरती नगर येथील आश्रमात मोठा गोंधळ उडाला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि समर्थकांनी केला आहे. सुरुवातीला साध्वींच्या वडिलांनी शवविच्छेदनास नकार दिल्याने तणाव अधिक वाढला. नागरिकांनी त्यांची गाडी अडवून पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली. तसेच आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेमुळे जोधपूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावरील दबाव, तांत्रिक बाबी आणि घटनास्थळावरील पुरावे यांचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याचे आव्हान आता तपास यंत्रणेसमोर आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ