सलमान खान प्रकरणासारखीच कार्यपद्धती, बिश्नोई गँगचा संशय
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील इमारतीबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात आरोपी चालत येऊन थेट इमारतीसमोर थांबतो आणि गोळीबार करून निघून जातो, असं स्पष्टपणे दिसत आहे.
प्राथमिक तपासानुसार, हा आरोपी एकटाच असल्याचं समोर आलं आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुहू परिसरात बाइकवरून आला होता. त्याने रोहित शेट्टी यांच्या घरापासून काही अंतरावर आपली बाइक उभी केली आणि त्यानंतर चालत इमारतीसमोर गेला. काही क्षण थांबून त्याने चार ते पाच राऊंड फायरिंग केली आणि लगेचच पुन्हा बाइकवरून घटनास्थळावरून पळ काढला.
या गोळीबाराची पद्धत पाहता, सलमान खान यांच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर झालेल्या गोळीबाराशी या घटनेचं साधर्म्य असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात बिश्नोई गँगचा सहभाग असण्याची शक्यता मुंबई पोलिसांकडून तपासली जात आहे.
ही घटना रविवारी पहाटे घडली असून सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून रोहित शेट्टी यांच्या इमारतीबाहेर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनेच्या वेळी रोहित शेट्टी घरात उपस्थित होते की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं संयुक्तपणे करत आहेत. आरोपीची ओळख पटवण्यासाठी आणि संपूर्ण घटनाक्रम निश्चित करण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करत आहे.
याआधी सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात बिश्नोई गँगचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यामुळे आता रोहित शेट्टी यांच्या इमारतीबाहेरील गोळीबारामागेही त्याच टोळीचा हात आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणामागची खरी कारणं आणि आरोपींची ओळख स्पष्ट होणार आहे.




