अजित पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या विविध चर्चांमुळे राज्यभर संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. विमान अपघाताशी संबंधित दावे, भावनिक व्हिडीओ आणि अप्रमाणित माहिती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील सदस्य आणि आमदार रोहित पवारयांनी 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.
रोहित पवार म्हणाले की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक पोस्ट्स आणि व्हिडीओंमुळे लोकांमध्ये गैरसमज वाढले. “काही जण भावनेच्या भरात ‘दादा परत येतील’ अशा आशयाचे व्हिडीओ शेअर करत होते. विमानात किती लोक होते, कोणाची ओळख पटली नाही, असे दावे केले जात होते. पण या सगळ्या अफवा आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
पिंपरी-चिंचवडमध्ये एका सामान्य नागरिकानेही याबाबत विचारणा केल्याचा प्रसंग सांगत रोहित पवार यांनी म्हटलं की, लोकांपर्यंत सत्य पोहोचणं गरजेचं आहे. “घटना घडलीच नाही, असं वाटावं इतका धक्का बसलेला असतो. पण वास्तव स्वीकारणं भाग आहे,” असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “आम्ही सत्तेत नाही, तरीही उपलब्ध माहिती, अधिकृत नोंदी आणि खात्रीशीर तपशील गोळा करून लोकांसमोर मांडले. अजित पवारांवरील प्रेमापोटीच हा प्रयत्न केला. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सत्याची खात्री करूनच कोणतीही माहिती शेअर करावी,” असं आवाहन त्यांनी केलं.




