मुंबईत थरार! शूटिंगच्या नावाखाली मुलांना ओलीस; पोलिसांच्या कारवाईत रोहित आर्य ठार
पवईतील आरए स्टुडिओत घडली धक्कादायक घटना; पोलिसांच्या शौर्यपूर्ण ऑपरेशनमुळे सर्व मुलांची सुखरूप सुटका
मुंबईच्या पवई परिसरात गुरुवारी सिनेमा शूटिंगच्या नावाखाली घडलेल्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने मुलांना शूटिंगसाठी बोलावून घेतल्यानंतर त्यांना ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना आरए स्टुडिओमध्ये घडली असून, पोलिसांनी वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
रोहित आर्याने आधी सर्व पालकांना संदेश पाठवला होता “आज शूटिंगला वेळ लागेल, मुलांना दहा मिनिटांत भेटून घ्या.” मात्र पालकांना भेटू न देता त्याने स्टुडिओचे दरवाजे बंद केले आणि मुलांना ओलीस ठेवलं. त्यानंतर त्याने स्वतःचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनी जवळपास दीड तास त्याच्याशी संवाद साधून समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्यास तयार नव्हता.
शेवटी पोलिसांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवत दुसऱ्या बाजूने शिडीच्या मदतीने टॉयलेटच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पवई पोलिस ठाण्याचे एटीसी सेलचे अधिकारी एपीआय अमोल वाघमारे साध्या वेषात आत गेले. त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर रोहित आर्या बॅगमधून शस्त्र काढण्याच्या तयारीत होता. त्याच क्षणी वाघमारे यांनी तत्परतेने गोळी झाडली आणि रोहित आर्या ठार झाला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मुलांच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले असून, या घटनेने मुंबईतील पालकवर्गात प्रचंड चिंता आणि भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आरए स्टुडिओ कडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं असून त्यांनी म्हटलं आहे की, “घटना आमच्या स्टुडिओत घडली, पण हे बुकिंग बाहेरील व्यक्तीने केलं होतं. मुंबई पोलिसांनी तत्काळ आणि धाडसी पद्धतीने कारवाई करून मुलांना वाचवलं, त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. आमचा स्टाफ पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे.”




