१९ जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या (Rohit Arya) मागणीवरून केसरकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न; ‘मंत्री नसल्याने ठोस आश्वासन देऊ शकलो नसतो,’ केसरकरांचे स्पष्टीकरण
पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये ३० ऑक्टोबर रोजी घडलेल्या ओलीस प्रकरणानंतर मुंबई पोलिसांसमोर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आर्थिक व्यवहारांवरील वादातून रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने १५ अल्पवयीन मुलांसह १९ जणांना ओलीस धरलं होतं. शिक्षण विभागाकडील थकीत रकमेच्या मागणीवरून हे कृत्य केल्याचा दावा त्याने केला होता. पोलिसांच्या कारवाईत अखेर एन्काऊंटरदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेदरम्यान रोहित आर्याने (Rohit Arya) पोलिसांमार्फत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. मात्र केसरकर यांनी त्या संवादास नकार दिल्याची माहिती आता समोर आली आहे. या संदर्भात स्वतः केसरकरांनीही कबुली दिली असून त्यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
“मी सध्या मंत्री नाही. त्यामुळे त्या वेळी रोहित आर्याला कोणतंही ठोस आश्वासन देणं शक्य नव्हतं. मुलं ओलीस असताना फक्त आश्वासन नव्हे, तर ठोस हमी आवश्यक होती. म्हणून मी पोलिसांना सांगितलं की, त्याने संबंधित मंत्री किंवा शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलावं,” असं केसरकर यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “या प्रकरणात पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं तर मी पूर्ण सहकार्य करीन.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आता गुन्हे शाखा तपास अधिकच गतीमान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रोहित आर्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं आहे. जे. जे. रुग्णालयातील पोस्टमॉर्टम अहवालानुसार, त्याच्या मृत्यूचं कारण गोळी लागणं हेच आहे. गोळी लागल्याने त्याच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
एकूणच, पवईतील (Powai) या थरारक ओलीस प्रकरणानंतर राजकीय आणि पोलिस पातळीवर नवे प्रश्न निर्माण झाले असून, केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




