रिवाबा जडेजा गुजरात मंत्रिमंडळात, 97 कोटींची संपत्ती उघड!
टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) यांनी राजकारणात मोठी झेप घेतली आहे. गुजरातच्या भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या मंत्रिमंडळ 2.0 मध्ये त्यांचा समावेश झाला असून, त्यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. क्रिकेटच्या मैदानात रवींद्र जडेजा आपल्या खेळाने सर्वांना भुरळ घालत असताना, रिवाबा राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत.34 वर्षीय रिवाबा यांनी 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर विजय मिळवला होता. मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या रिवाबा यांनी राजकोट येथे 1990 मध्ये जन्म घेतला. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलात, त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 97.35 कोटी रुपये आहे, आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.रिवाबा यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेचा मोठा हिस्सा रवींद्र जडेजाच्या नावावर आहे, ज्याची किंमत 70 कोटींहून अधिक आहे.
रिवाबा यांच्याकडे 4 लाख रुपये रोख आणि बँक खात्यात 11 हजार रुपये आहेत, तर रवींद्र जडेजाच्या खात्यात 13 कोटींहून अधिक रक्कम आहे. याशिवाय, कुटुंबातील एका सदस्याच्या खात्यात 26 कोटी रुपये जमा आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे कोणतेही वाहन, विमा पॉलिसी किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक नाही. मात्र, त्यांच्याकडे 56 लाख रुपये किमतीचे सोने, हिरे आणि 15 किलो चांदी आहे. रवींद्र जडेजाकडे ऑडी, फोर्ड एंडेव्हर आणि पोलो जीटीसारखी वाहने आहेत.रिवाबा यांनी आपल्या मालमत्तेच्या तपशीलात स्पष्ट केले की त्यांच्या नावावर शेतजमीन, व्यावसायिक इमारत किंवा स्वतःचे घर नाही. दुसरीकडे, रवींद्र जडेजाकडे 33 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात जडेजा कुटुंब आपली छाप पाडत आहे.




