महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट, शिंदे गटाकडे उपमहापौरपद; ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली. तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांना संधी देण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असणार आहे.
महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र अखेर रितू तावडे यांनी ही संधी मिळवली. यंदा मुंबई महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने तावडे यांचे नाव आघाडीवर होते.
महापौरपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना रितू तावडे म्हणाल्या, “भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. पक्ष जो निर्णय घेतो तो आम्हाला मान्य असतो. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. सर्वांनी प्रामाणिकपणे आणि पारदर्शक काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
रितू तावडे या भाजपच्या अनुभवी नगरसेविका आहेत. त्यांनी 2012 मध्ये प्रभाग क्रमांक 127 मधून पहिला विजय मिळवला. 2017 मध्ये घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 121 मधून त्या निवडून आल्या. त्यानंतर 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 132 मधून त्यांनी पुन्हा एकदा यश संपादन केले. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळे त्या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.
दरम्यान, उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाने संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी घाडी यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, अशी माहिती दिली. मुंबई महापालिकेत पदवाटपाची पद्धत कायम ठेवत शिंदे गटाने आपला दावा मजबूत केला आहे.
संजय घाडी यांचा राजकीय प्रवास दीर्घ आणि विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला आहे. 1988-89 मध्ये ते शिवसेनाप्रणीत भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख होते. 1990-91 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आणि सिनेट सदस्य म्हणूनही काम केले. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस, शिवसेनेचे उपनेते राहिले असून सध्या रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत. 2017 ते 2022 या काळात ते शिवसेनेचे नगरसेवक होते आणि सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत, तर मुलगा सुयश युवासेनेत विधानसभा समन्वयक म्हणून कार्यरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून महापौरपदासाठी कोणाला संधी दिली जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. उमेदवार मराठी असेल की अमराठी, यावरही तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर भाजपने रितू तावडे या मराठी उमेदवाराला संधी देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे त्या गुजरातीबहुल घाटकोपर भागातून राजकारण करतात.
आता भाजप आणि शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित झाल्याने ठाकरे गट काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात आज ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक होणार असून, महापौर निवडणुकीसाठी उमेदवार द्यायचा की नाही, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.




