दैवी परंपरांचं सादरीकरण पॉप कल्चर होऊ नये, स्टेजवरील नक्कल मला अस्वस्थ करते – ऋषभ शेट्टी
गोव्यात पार पडलेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) समारोप समारंभात अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ‘कांतारा : चॅप्टर 1’मधील क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ असा केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने रणवीर सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती. वाद वाढल्यानंतर रणवीरने जाहीर माफी मागत, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं होतं.
या संपूर्ण प्रकरणावर आता ‘कांतारा’चा अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिहाइंड वुड्स’च्या चेन्नईतील एका कार्यक्रमात बोलताना, रणवीरचं नाव न घेता ऋषभ म्हणाले की, अशा विषयांवर चित्रपट बनवणं ही मोठी जोखीम असते. आपली संस्कृती आणि परंपरा लोकांनी केवळ पॉप कल्चर म्हणून पाहू नये, याची काळजी घ्यायला हवी.
चित्रपटासाठी दैवी परंपरांचं चित्रण करताना संबंधित लोकांशी चर्चा करून, त्यांच्या परवानगीने आणि पूर्ण आदरभावनेनंच भूमिका साकारल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र चित्रपटानंतर काही ठिकाणी स्टेजवर देवतेची नक्कल किंवा अभिनय केला जातो, तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं, असंही ऋषभ यांनी नमूद केलं. दैवी तत्त्वं अत्यंत पवित्र आणि संवेदनशील असल्यामुळे, अशा सादरीकरणांपासून दूर राहावं, अशी ते नेहमीच विनंती करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, रणवीर सिंहने आपल्या स्पष्टीकरणात ‘कांतारा’मधील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचं कौतुक करण्याचा आपला हेतू होता, असं सांगितलं होतं. देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा आपण आदर करतो, आणि आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगीर आहोत, असंही रणवीरने म्हटलं होतं.
तुळू समाजात चावुंडी देवीला विशेष महत्त्व असून, त्यांच्या अपमानास्पद उल्लेखामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप हिंदू जनजागृती समितीने नोंदवला होता.




