‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्रीचे प्री-वेडिंग सोहळे सुरू, चाहत्यांमध्ये उत्सुकता
मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचे वातावरण पाहायला मिळत आहे. अलीकडे अनेक कलाकारांनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अशातच ‘लग्नाची बेडी’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेवती लेले हिच्याही घरी आता लग्नाची लगबग सुरू झाली आहे.
रेवती गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत ‘अमृता’ या खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती. मालिका संपल्यानंतरही ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत राहिली आहे.
अभिनेत्रीने अलीकडेच पारंपरिक मुंडावळ्या घातलेल्या लूकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या घरी लग्नाआधीचे विधी सुरू झाल्याचे या फोटोंवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ती लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
यापूर्वी रेवतीने इंस्टाग्रामवर अंगठीचा फोटो शेअर करत आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. मात्र होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिने अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही. एका फोटोमध्ये तिने हातातील चमकदार अंगठीवर लक्ष केंद्रित करत मागे उभ्या असलेल्या व्यक्तीची हलकीशी झलक दाखवली होती. “मी होकार देण्याआधीच मनाने होकार दिला होता,” अशा भावनिक शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, तिच्यासाठी खास केळवण सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुकन्या मोने, नंदिनी वैद्य आणि गिरीजा प्रभू यांसारख्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
रेवतीच्या लग्नाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी तिच्या चाहत्यांना आता तिच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाची उत्सुकता लागली आहे.




