‘ऑपरेशन सिंदूर’ थीमवर राफेल, सुखोई-30, मिग-29सह अत्याधुनिक लढाऊ विमानांचा दमदार सहभाग
देशभरात 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू होऊन भारत एक सार्वभौम, लोकशाही गणराज्य म्हणून अस्तित्वात आला. त्या गौरवशाली दिवसाच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर भव्य परेडचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीच्या परेडचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार असून सकाळी 9:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. नागरिकांसाठी कर्तव्य पथाचे प्रवेशद्वार सकाळी 7:30 वाजता खुले केले जाणार आहेत. परेडमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता, संरक्षण क्षेत्रातील सामर्थ्य, वैज्ञानिक प्रगती आणि आत्मनिर्भर भारत अभियानाची झलक पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे खास आकर्षण म्हणजे भारतीय वायुसेनेच्या भव्य हवाई कसरती. ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित या एअर शोमध्ये राफेल, सुखोई-30, मिग-29 आणि जॅग्वार यांसारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आकाशात थरारक प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या माध्यमातून जगाला भारताच्या हवाई शक्तीचे आणि तांत्रिक क्षमतेचे प्रभावी दर्शन घडणार आहे.
दरम्यान, यंदाच्या सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मान्यवर उपस्थित राहणार असून युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयेन हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे भारताच्या जागतिक राजनैतिक संबंधांना नवी ऊर्जा मिळणार आहे.




