spot_img

RBI Gold Reserve : देशाच्या तिजोरीतून गायब झाले लाखो कोटींचे सोने?

spot_img

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान दिवसेंदिवस मजबूत होत असतानाच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीने संपूर्ण आर्थिक जगताला आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण ऐकत होतो की भारताचा परकीय चलन साठा विक्रमी पातळीवर जात आहे, पण एका आठवड्यात असं काय घडलं की देशाच्या तिजोरीतून अब्जावधी डॉलर्स कमी झाले? विशेषतः सोन्याच्या साठ्यात झालेली मोठी घसरण हा चिंतेचा विषय आहे की निव्वळ तांत्रिक बदल? भारताचा परकीय चलन साठा अर्थात Forex Reserve एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात का घटला आणि याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

RBI ने 6 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्याची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठ्यात 6.711 अब्ज डॉलर्सची मोठी घट झाली असून तो आता 717.064 अब्ज डॉलर्सवर आला आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल, की त्याच्या आदल्या आठवड्यात भारताचा हा साठा 723.774 अब्ज डॉलर्स या ऐतिहासिक उच्चांकावर होता. पण एका आठवड्यात या साठ्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्यात 14.595 अब्ज डॉलर्सची अभूतपूर्व वाढ झाली होती. पण या आठवड्यात तब्बल 14.208 अब्ज डॉलर्सची घट नोंदवण्यात आली आहे. रुपयांमध्ये सांगायचे झाले तर, फक्त एका आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य हे अंदाजे 1.28 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

2 जानेवारीनंतर पहिल्यांदाच सोन्याच्या साठ्यात इतकी मोठी घट आपल्याला पाहायला मिळत आहे. पण प्रश्न असा पडतो की, आरबीआयने सोने विकले की फक्त किंमत कमी झाली? जेव्हा आपण ‘सोन्याचा साठा’ म्हणतो, तेव्हा त्याचे मूल्य हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते. जर जागतिक बाजारात सोन्याचे भाव पडले, तर आरबीआयकडे असलेल्या सोन्याचे एकूण मूल्यही कमी दिसते. मात्र, गेल्या चार आठवड्यात आपण एक वेगळेच चित्र पाहिले होते. भारताचा परकीय चलन साठा सलग चार आठवडे वाढत होता. या काळात एकूण साठ्यात 36.97 अब्ज डॉलर्सची भर पडली होती. तज्ञांच्या मते, युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्ससोबत भारताचे जे महत्त्वाचे व्यापार करार झाले आहेत, त्याचा हा सकारात्मक परिणाम होता.

आरबीआयच्या रिपोर्टमधील इतर महत्त्वाचे घटक समजून घेऊया. त्यातील पहिलं आहे Foreign Currency Assets (FCA): एकूण परकीय चलन साठ्याचा हा सर्वात मोठा भाग असतो. 6 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन मालमत्तेत 7.661 अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती 570.053 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. म्हणजे एकीकडे सोने कमी झाले असले तरी चलन मालमत्तेत वाढ झाली आहे. दुसरं आहे Special Drawing Rights (SDRs): आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडील भारताचे SDR 132 दशलक्ष डॉलर्सने घसरून 18.812 अब्ज डॉलर्सवर आले आहेत. आणि तिसरं आहे IMF कडील राखीव निधी: IMF कडे असलेल्या भारताच्या राखीव निधीतही 32 दशलक्ष डॉलर्सची घट झाली असून तो 4.715 अब्ज डॉलर्स झाला आहे.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न – “या आकडेवारीचा तुमच्या-आमच्यावर काय परिणाम होणार?” पहिल्यांदा हे समजून घ्या की, परकीय चलन साठ्यात चढ-उतार होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जरी 14 अब्ज डॉलर्सचा आकडा मोठा वाटत असला, तरी भारताचा एकूण साठा अजूनही 717 अब्ज डॉलर्सच्या वर आहे, जो देशाला कोणत्याही आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पुरेसा आहे. या घसरणीची काही महत्वाची कारणे देखील आहेत. पहिलं कारण आहे सोन्याच्या किमतीत बदल. जागतिक स्तरावर डॉलर मजबूत झाला की सोन्याच्या किमतीत सुधारणा होते, ज्यामुळे साठ्याचे मूल्य कमी दिसते. दुसरं कारण आहे आरबीआयचा हस्तक्षेप. रुपयाची किंमत स्थिर ठेवण्यासाठी आरबीआय अनेकदा डॉलरची विक्री करते. तज्ञांच्या मते, ही एक तात्पुरती घट असू शकते. भारताची आर्थिक स्थिती अजूनही मजबूत आहे कारण सलग चार आठवडे आपण मोठी प्रगती पाहिली होती.

आरबीआयची या नवी आकडेवारीवरुन आपल्याला समजते की जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता भारताच्या तिजोरीवरही परिणाम करु शकते. सोन्याच्या किमतीतील बदलामुळे ही मोठी घट दिसत असली, तरी भारताचा परकीय चलन साठा सुरक्षित पातळीवर आहे. सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होईल का? आणि याचा भारतीय रुपयावर काय परिणाम होईल? यावर देखील आम्ही नजर ठेवून आहोत आणि ती माहितीही आपल्यापर्यंत आम्ही अशाच पद्धतीने पोहचवत राहू.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ