पुण्यातील राजकीय वातावरणात सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याभोवती वादळी चर्चा सुरू आहेत. महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप करून खळबळ उडवली असून, आता पक्षातून त्यांना बाहेर काढण्याच्या अफवांवरही त्यांनी शेल टाकली आहे. पुण्यातील कोथरुड (Kothrud) भागातील घायवळ टोळीच्या गुंडगिरीनंतर धंगेकरांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) आणि त्यांच्या निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गुन्हेगारांना आश्रय देण्याचा आरोप केला. यानंतर जैन बोर्डिंगच्या जमिनीवर झालेल्या घोटाळ्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Mrulidhar Mohal) यांच्यावर निशाना साधत, जमीन हडपण्याचा ठपका ठेवला. या आरोपांमुळे धंगेकरांना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंकडून समज देण्यात आल्याच्या चर्चा होत्या, पण धंगेकरांनी त्याकडे दुर्लक्ष करत लढा चालू ठेवला आहे.
आता सोशल मीडियावरून त्यांनी पुन्हा एकदा या वादाला नवे वळण दिले आहे.एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये धंगेकरांनी नाव न घेता मोहोळांवरच टीका करत म्हटले आहे की, २०२४ मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मीडियात बातम्या पेरणारा हा नेते आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी पक्ष कारवाईच्या खोट्या अफवा पसरवतोय. “तो कोण आहे हे आदरणीय फडणवीस साहेबांना माहीत आहे,” असा खोचक उल्लेख करत धंगेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे. #SaveHDN आणि #punelandscam हे हॅशटॅग वापरून त्यांनी जैन बोर्डिंग घोटाळ्याच्या मुद्द्यावर भर दिला असून, “मन में हैं विश्वास..! हम होंगे कमयाब…!!” असा निर्धार व्यक्त केला आहे. ही पोस्ट करून धंगेकरांनी पक्ष कारवाईच्या सर्व अफवा खोट्या असल्याचे स्पष्ट केले असून, स्वतःच्या लढ्याबाबतचा विश्वास कायम ठेवला आहे.याआधीही धंगेकरांनी एका ट्विटमध्ये शिंदेंच्या पाठबळावर विश्वास दाखवला होता.
“शिवसेना हे बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचारांचा पक्ष आहे. एकनाथराव शिंदे साहेब अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करत नाहीत, त्यांचे नेहमीच समर्थन राहील,” असं म्हणत त्यांनी भगवान महावीर मंदिर आणि जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या लुटीविरुद्धचा लढा सोडणार नाही असा इशारा दिला. “तुम्ही कितीही कट कारस्थाने केली तरी मी मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर!” असे शब्दांत त्यांनी निर्धार व्यक्त केला. एकनाथ शिंदेंचा त्यांना कधीच फोन आलेला नाही आणि ते पुणेकरांच्या हितासाठी लढण्यात रोखणार नाहीत, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मुख्यमंत्रीचे स्वप्न बघणाऱ्यांवर पुराव्यासह बोलणार, आणि रील स्टार म्हणणारे मी बिल्डरांसाठी नव्हे तर गोरगरिबांसाठी रील करतो,” असा प्रत्युत्तरही धंगेकरांनी दिला आहे.धंगेकरांच्या या सलग आरोपांमुळे महायुतीत तणाव वाढला असून, पुण्यातील राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त होत आहे. एकीकडे पक्ष कारवाईच्या चर्चा सुरू असताना धंगेकरांचा हा निर्भीड लढा कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरत आहे. शिंदे गटातील धंगेकरांचे भविष्य काय असेल आणि हा घोटाळा उघडकीस येईल का, हे पाहणे रोचक ठरेल.




