spot_img

Ratnagiri news : रत्नागिरीत राजकीय भूकंप, ठाकरे गटालाचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर?

spot_img

उदय सामंत यांच्या खुलाशाने ठाकरे गटात खळबळ; स्थानिक निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सातत्याने धक्के बसत आहेत. राज्यभरातील अनेक नेते उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) “जय महाराष्ट्र” म्हणत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सामील होत आहेत. आता रत्नागिरीच्या राजकारणातही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एका स्फोटक वक्तव्यात दावा केला आहे की, ठाकरे गटाचा एक मोठा नेता भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी खळबळजनक माहिती दिली. ते म्हणाले, “2024 च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने (Bal Mane) यांनी भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या सहाय्यकामार्फत त्यांनी पक्षप्रवेशाचा मार्ग शोधला आहे.” इतकेच नाही, तर सामंत यांनी पुढे सांगितले की, “माझ्या विरोधामुळे त्यांच्या प्रवेशात अडथळा येऊ नये, यासाठी मला देखील निरोप पाठवण्यात आले आहेत.” या वक्तव्यमुळे रत्नागिरीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना सामंत यांनी महायुतीच्या रणनीतीवर भाष्य केले. ते म्हणाले, “महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. योग्य वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत जाहीर घोषणा करतील. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक निवडणुकीतही आम्हाला मोठे यश मिळेल.” स्थानिक पातळीवरील मतभेदांवर तोडगा काढण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार या तिन्ही नेत्यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ही निवडणूक आमच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देता येणार नाही. सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल,” असे सामंत यांनी नमूद केले.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीगाठींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “जे वीस वर्षे एकत्र नव्हते, ते आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत,” असे खोचक उद्गार त्यांनी काढले. सामंत यांच्या या टीकेला ठाकरे गट आणि मनसे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ