निलेश घायवळ प्रकरणावरून विरोधकांचा हल्लाबोल; उद्धव ठाकरेंच्या गटावर रामदास कदमांचा पलटवार “बाळासाहेब आमचे दैवत, त्यांच्याबद्दल घाणेरडे विचार डोक्यातही येणार नाहीत”
पुण्यातील गोळीबार प्रकरणानंतर लंडनला फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या परवान्यावरील सही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावावर असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी यावरून योगेश कदमांवर हल्लाबोल केला असतानाच, आता शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे.
कदम म्हणाले, “गृहराज्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जर एखाद्या व्यक्तीवर एकही गुन्हा नाही, कोर्टात केस नाही, तर तो निर्णय वैध ठरतो. प्रत्येक निर्णयासाठी विरोधकांची परवानगी घ्यायची का?” असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.
तसेच त्यांनी आणखी एक धक्कादायक विधान करताना सांगितलं की, “योगेश कदम यांनी हा निर्णय एका न्यायाधीशांच्या सांगण्यावरून घेतला आहे. त्या व्यक्तीनेच त्यांना निर्देश दिले होते, आणि त्याचं नाव कदमांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं आहे.”
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे (BalaSaheb Thackery) यांच्याबाबत निर्माण झालेल्या वादावरही रामदास कदम म्हणाले, “बाळासाहेब आमचे दैवत होते आणि आहेत. उद्धवजींनी हाताचे ठसे घेतले, त्यात काही चुकीचं नाही. बाळासाहेबांची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या मनात त्यांच्या बद्दल कधीही चुकीचा विचार येऊ शकत नाही.”
या सगळ्या घडामोडींमुळे शस्त्र परवाना प्रकरणाभोवतीचं राजकारण अधिकच चिघळलं असून, ठाकरे आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोपांचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे.




