‘धुरंधर’च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडीओवरून झालेल्या वादावर अभिनेत्याने दिली स्पष्टीकरण.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटात 71 वर्षीय अभिनेते राकेश बेदी यांनी धूर्त राजकारणी जमील जमालीची भूमिका साकारली असून, 20 वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुन त्यांच्या मुलगी यालिना जमालीच्या भूमिकेत दिसते. नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून राकेश बेदी यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
व्हिडीओमध्ये सारा अर्जुन स्टेजवर येताच राकेश बेदी तिचं स्वागत करत तिला मिठी मारताना दिसतात. याच क्षणावरून काही नेटकऱ्यांनी त्यांनी तिच्या खांद्यावर किस केल्याचा आरोप केला. या दाव्यांमुळे सोशल मीडियावर वादळ उठलं. अखेर या संपूर्ण प्रकरणावर राकेश बेदी यांनी मौन सोडत ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राकेश बेदी (Rakesh Bedi) म्हणाले, “हे सगळं पाहून मला फारच आश्चर्य वाटलं. सारा माझ्या मुलीच्या वयाची आहे आणि चित्रपटातही ती माझीच मुलगी आहे. शूटिंगदरम्यान आमचं नातं कायम वडील-मुलीसारखंच राहिलं. ती नेहमी प्रेमानं मला मिठी मारायची आणि त्यात काहीही गैर नव्हतं.” ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमातही परिस्थिती वेगळी नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले, “लोकांना त्या क्षणात प्रेम आणि आपुलकी दिसली नाही, तर त्यात माझी काय चूक? बघणाऱ्याच्या नजरेतच दोष असेल, तर आपण काहीच करू शकत नाही.” विशेष म्हणजे, त्या कार्यक्रमाला सारा अर्जुनचे आई-वडीलही उपस्थित होते. “मी सार्वजनिक ठिकाणी, तिच्या पालकांसमोर, चुकीच्या उद्देशाने असं काही करेन का? लोकांना फक्त सोशल मीडियावर वाद निर्माण करण्यासाठी विषय हवा असतो,” असंही बेदी यांनी ठामपणे सांगितलं.
सारा अर्जुन ही प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी असून, ती लहानपणापासून अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. तिने आतापर्यंत अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारखे दिग्गज कलाकार झळकत आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 500 कोटी रुपयांचा टप्पा पार करत मोठं यश मिळवलं आहे.




