भारतीय कला विश्वात एक नवा इतिहास घडला असून, प्रख्यात चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राने विक्रमी किंमत मिळवत सर्वाधिक महागड्या भारतीय कलाकृतीचा मान पटकावला आहे. मुंबईत पार पडलेल्या लिलावात ही कलाकृती तब्बल 167.2 कोटी रुपयांना विकली गेली. काही मिनिटे चाललेल्या जोरदार बोलीनंतर या चित्राने ही ऐतिहासिक उंची गाठली.
या आधी सर्वाधिक किमतीचा विक्रम एम. एफ. हुसेन यांच्या ‘ग्राम यात्रा’ या चित्राच्या नावावर होता, ज्याची विक्री 118 कोटी रुपयांना झाली होती. मात्र, नव्या विक्रीमुळे हा विक्रम मागे पडला आहे.
ही बहुमूल्य कलाकृती उद्योगपती सायरस पूनावाला यांनी विकत घेतली आहे. त्यांनी या चित्राला केवळ वैयक्तिक संग्रहाचा भाग न मानता ‘राष्ट्रीय ठेवा’ असे संबोधले असून, ते वेळोवेळी सर्वांसाठी प्रदर्शित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘यशोदा आणि कृष्ण’ हे चित्र 1890 च्या दशकातील असून, भागवत पुराणातील एका प्रसंगावर आधारित आहे. यामध्ये माता यशोदा आणि बालकृष्ण यांच्यातील स्नेहपूर्ण नात्याचे अत्यंत भावपूर्ण चित्रण करण्यात आले आहे. प्रकाश आणि सावल्यांचा प्रभावी वापर ही या चित्राची खास वैशिष्ट्ये मानली जातात.
या विक्रमी व्यवहारामुळे भारतीय कला बाजाराला मोठी चालना मिळाल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे भारतीय कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मान्यता मिळेल आणि कला ही एक महत्त्वाची गुंतवणूक म्हणूनही अधिक दृढपणे समोर येईल.




