राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता सर्व महानगरपालिकांमधील निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. कोणत्या वॉर्डात कोणत्या पक्षाचे उमेदवार आमनेसामने आहेत, हे जवळपास ठरलेलं असून त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील ठाकरे बंधूंच्या युतीनं मुंबईसाठी “मिनी जाहीरनामा” जाहीर केला आहे. मुंबईसाठी राबवायच्या १६ महत्त्वाच्या मुद्द्यांचं सादरीकरण आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे केलं. ठाकरे बंधूंच्या युतीचे २२७ उमेदवार उपस्थित असताना हे प्रेझेंटेशन करण्यात आलं.
आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संयुक्त जाहीरनामा अधिकृतपणे प्रसिद्ध करणार आहेत. यासाठी राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार असल्याने या घटनेला विशेष राजकीय महत्त्व आहे. यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू मिळून सहा प्रचारसभा घेणार आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचाही प्रचार आजपासून सुरू होणार आहे.
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा असण्याची शक्यता आहे. ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफी, १०० युनिटपर्यंत मोफत वीज, घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत, कोळी महिलांसाठी १० रुपयांत जेवणाची सुविधा, तरुणांसाठी रोजगार सहायता निधी, बेस्ट बसचे तिकीट दर ५ ते २० रुपयांच्या दरम्यान स्थिर ठेवणे, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर, पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरू करणे अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश असणार आहे.
यासोबतच प्रत्येक प्रभागात मिनी क्रीडा संकुल, मुंबई पालिकेकडून मोफत पार्किंग सुविधा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भव्य ग्रंथालय, तसेच बीपीटीच्या १८०० एकर जागेवर गिफ्ट सिटीच्या धर्तीवर विकास प्रकल्प उभारण्याचाही उल्लेख जाहीरनाम्यात असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विकासासाठी ठाकरे बंधूंचा हा जाहीरनामा किती प्रभावी ठरतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.




