संयुक्त मुलाखतीत राज ठाकरे आक्रमक; “अंबानी आधी मोठे, अदानी मोदींनंतरच वाढले” असा घणाघात
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी युती करत पहिल्यांदाच एकत्रित भूमिका घेतली आहे. या युतीनंतर दोघांनी नुकतीच एक संयुक्त मुलाखत दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली असून, त्यात ठाकरे बंधूंनी विविध राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांचाही मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि अदानी समूहावर जोरदार टीका केली. “मुंबईतील सध्याच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो आधीच नवी मुंबईला हलवण्यास सुरुवात झाली आहे. पुढे हळूहळू डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणंही तिकडेच नेली जातील. मुंबईतील विमानतळ आधीपासूनच अदानीकडे आहे. हे विमानतळ क्षेत्रफळाने इतकं मोठं आहे की त्यात किमान 50 शिवाजी पार्क मैदानं मावू शकतील. उद्या सगळं विमानतळ नवी मुंबईला हलवून इथली ही प्रचंड जमीन विक्रीसाठी काढण्याचाच हा डाव आहे,” असा आरोप त्यांनी केला.
यावर संजय राऊत यांनी “हे सगळं मोदी आणि शहा सत्तेत आल्यामुळेच घडतंय का?” असा थेट प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक स्पष्ट केला. “अंबानी हे मोदी मोठे होण्याच्या आधीपासूनच देशातील मोठे उद्योगपती होते. पण अदानी हे मोदी राजकारणात वर येईपर्यंत एवढे मोठे नव्हते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानीच्या उद्योगांचा विस्तार वेगाने झाला,” असा दावा त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी पुढे भाजपला सवाल केला की, “जर केंद्रात काँग्रेस किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षाचं सरकार असतं आणि त्यांनी एकाच उद्योगपतीवर इतकी कृपादृष्टी दाखवली असती, तर भाजपाची प्रतिक्रिया काय असती?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एकूणच, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या या संयुक्त मुलाखतीतून भाजप आणि मोठ्या उद्योगसमूहांविरोधात तीव्र राजकीय भूमिका समोर आली असून, आगामी निवडणुकांत हे मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.




