spot_img

Rahul Narvekar : मुंबई महापालिका अर्ज भरण्यावरून वाद, राहुल नार्वेकरांवरील आरोप फेटाळले

spot_img

हरिभाऊ राठोडांच्या धमकीच्या आरोपांना उत्तर देत नार्वेकर म्हणाले – आरोप हास्यास्पद, पराभव झाकण्याचा प्रयत्न

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narevekar) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी नार्वेकर यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अर्ज भरण्याच्या ठिकाणी नार्वेकर हे भाजपच्या (BJP) उमेदवारांसोबत उपस्थित होते, त्याच वेळी हरिभाऊ राठोड देखील तिथे दाखल झाले आणि याच ठिकाणी वादाला तोंड फुटल्याचं सांगण्यात येत आहे.

हरिभाऊ राठोड यांच्या म्हणण्यानुसार, राहुल नार्वेकर सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी वारंवार ये-जा करत होते. तसेच त्यांनी आपल्याला धमकी देत “तुम्हाला सिक्युरिटी कोणी दिली?” असा सवाल केल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णतः हास्यास्पद असून, संभाव्य पराभव लपवण्यासाठीच असे आरोप केले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत एकूण ३६ आमदार असून, प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातील उमेदवारांसोबत अर्ज भरायला जातो, ही सर्वसाधारण प्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं. कुलाबा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आपणही आपल्या उमेदवारांसोबत गेलो होतो, असं स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिलं.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एका उमेदवारासोबत केवळ दोन व्यक्तींनाच जाण्याची परवानगी असते आणि त्या चौकटीत राहूनच आपण तिथे गेलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आरओ कार्यालयातून बाहेर पडत असताना माजी विधान परिषद सदस्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला घेराव घालत धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोपही नार्वेकर यांनी केला आहे. सुरक्षेचा गैरवापर होत असल्याचं लक्षात आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणं हे आपलं कर्तव्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आपण पोलिंग स्टेशनवर गेलो हे अनुचित असल्याचा आरोप करणाऱ्यांवर पलटवार करत, “हरिभाऊ राठोड तिथे पूजा करायला गेले होते का?” असा सवाल नार्वेकर यांनी उपस्थित केला. संविधानाचा भंग होईल असं कोणतंही कृत्य आपण कधीही करणार नाही, असं सांगत, विधानसभा अध्यक्षांना घेराव घालणारे आणि आरओंना बाहेर पडू न देण्याची भाषा करणारे नेमके कोण होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. या प्रकरणामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ