spot_img

Radhika Apte : “ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो” – राधिका आपटेनं सांगितला चित्रपटसृष्टीतील कटू अनुभव

spot_img

करिअरच्या सुरुवातीला साऊथ चित्रपटांत काम करताना सहन करावा लागला मानसिक त्रास; कार्यसंस्कृतीवर राधिकाचा थेट सवाल

अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) गेल्या दोन दशकांत चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज ती अशा टप्प्यावर आहे जिथे कोणती भूमिका स्वीकारायची आणि कोणती नाकारायची, हे निर्णय ती स्वतः ठामपणे घेऊ शकते. मात्र, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या काळात तिला अनेक कठीण आणि अस्वस्थ करणाऱ्या अनुभवांना सामोरं जावं लागलं, याचा खुलासा तिनं नुकताच केला आहे.

राधिकाने अभिनयाची सुरुवात ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून केली. त्यानंतर २००९ मध्ये ‘अँथीन’ या बंगाली चित्रपटात तिला मुख्य भूमिका मिळाली. मात्र, २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बदलापूर’ चित्रपटानंतर तिला खरी ओळख मिळाली आणि तिच्या करिअरला वेग आला. या दरम्यान तिनं साऊथ इंडस्ट्रीतही काही चित्रपट केले, पण तिथे तिला अत्यंत त्रासदायक अनुभवांना सामोरं जावं लागलं.

एका मुलाखतीत बोलताना राधिका आपटेनं सांगितलं की, काही मोठ्या नावांच्या हिंदी चित्रपटांपासून तिनं स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवलं. मात्र, आर्थिक गरजेमुळे जेव्हा तिनं साऊथचे चित्रपट स्वीकारले, तेव्हा तिथली कार्यसंस्कृती तिच्यासाठी धक्कादायक ठरली. तिनं कोणाचंही नाव घेतलं नाही, पण “ते खूप मोठे आणि प्रभावशाली लोक होते, आणि मी त्यांच्यासोबत पुन्हा कधीच काम करणार नाही,” असं ती ठामपणे म्हणाली.

राधिकाने एका अनुभवाचा उल्लेख करताना सांगितलं की, एका चित्रपटाच्या सेटवर ती एकमेव महिला होती. शूटिंग एका लहान गावात सुरू होतं आणि तिथे तिच्या शरीरावर पॅडिंग लावण्याबाबत अस्वस्थ करणाऱ्या सूचना दिल्या गेल्या. “अजून पॅडिंग लावा,” असं सतत सांगितलं जात होतं, आणि हे सगळं मानसिकदृष्ट्या फार वेदनादायक होतं, असं तिनं सांगितलं.

त्या काळात तिच्याकडे ना मॅनेजर होता, ना एजंट. तिची संपूर्ण टीम पुरुषांची होती आणि स्वतःचा संघ तयार करण्याची परवानगीही तिला नाकारण्यात आली होती. “मी स्वभावाने स्पष्टवक्ती आणि धाडसी आहे, पण ते दिवस आठवले तरी आजही मला थरकाप होतो,” असं राधिका म्हणाली.

पुढे बोलताना राधिकाने स्पष्ट केलं की, अशा परिस्थितीत पुन्हा कधीही अडकायचं नाही. “कोणत्याही स्त्रीने असा त्रास सहन करू नये. ते अनुभव खूप वेदनादायक होते,” असं ती भावूक होत म्हणाली.

या संपूर्ण कार्यसंस्कृतीबद्दल बोलताना राधिका आपटेनं केवळ पुरुषांनाच नाही, तर उच्च पदांवर असलेल्या महिलांनाही जबाबदार धरलं. “सत्तास्थानी असलेल्या अनेक महिला बदल घडवू शकतात, पण त्या तसे करत नाहीत. ही गोष्ट मला सर्वात जास्त त्रास देते,” असा परखड सवाल तिनं उपस्थित केला. राधिका आपटेचा हा अनुभव चित्रपटसृष्टीतील अंधाऱ्या बाजूकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारा ठरत असून, कार्यसंस्कृतीत बदल होण्याची गरज अधोरेखित करतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ