व्हिसा मिळाल्याचं शेअर करताच भडकले चाहते
मराठमोळा अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुष्करने यावेळी एका खास कारणामुळे लक्ष वेधलं आहे. त्याला संयुक्त अरब अमीरातचा (UAE) गोल्डन व्हिसा मिळाल्याचं त्याने स्वतः सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.पुष्करने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, “शेवटी माझा गोल्डन व्हिसा मिळाला. आता मी अधिकृतपणे यूएईचा रहिवासी आहे. हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तिच्या सुरक्षिततेसाठी आणि तिच्या आनंदासाठी.” त्याने या पोस्टसोबत काही फोटोदेखील शेअर केले आहेत. पुष्करने ही माहिती शेअर करताच त्याच्या अनेक चात्यांनी नाराजी व्यक्त केली असून अनेकांनी त्याला ट्रोल केलंय.
गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय कलाकार आणि उद्योजकांना यूएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. हा व्हिसा एक प्रतिष्ठेचं प्रतीक मानला जातो आणि त्याद्वारे धारकाला दीर्घकाळ तिथे राहण्याची आणि काम करण्याची मुभा मिळते. मात्र पुष्करच्या या आनंदवार्तेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.काही चाहत्यांनी त्याचं मनापासून अभिनंदन केलं आणि म्हटलं, “तू मेहनतीने जे मिळवलं आहेस, त्याचा आम्हाला अभिमान आहे.” तर काहींनी त्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काही नेटिझन्सनी प्रश्न उपस्थित केला की, “इथे पैसे कमवून, इथे मोठे होऊन, बाहेरच्या देशाचे कसे नागरिकत्व मिळवले हे सांगण्यात काय महान कामगिरी केलीय? मी तर म्हणते तुमच्या सारख्या लोकांना इथे परत कुणी कामच देऊ नये,तिथेच काही मिळतंय का बघा काम.आणि all for my daughter म्हणताय, शेवटी मुस्लिम कंट्री आहे ती तिथे मुलगी सुरक्षित असणार आहे हिंदू राष्ट्रापेक्षा? खरच तुमच्या या असल्या विचारसरणीचे कौतुक करावे का कीव करावी हेच कळत नाही.पुन्हा भारतात तोंड दाखवले नाहीत तर बरे होईल.”




