गैरसमज, खोड्या आणि रहस्यमय एण्ट्री; रिंकू राजगुरूच्या भूमिकेने वाढली उत्सुकता
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कुरळे बंधू पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बहुप्रतिक्षित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा डोस यावेळी अधिकच वाढलेला दिसतो आहे. ट्रेलर पाहता हा चित्रपट केवळ विनोदी नसून, शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवणारा असल्याचे स्पष्ट होते.
ट्रेलरमध्ये रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात सतत घडणाऱ्या विचित्र प्रसंगांची मालिकाच उलगडते. कधी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, तर कधी गैरसमजांचा गुंता इतका वाढतो की सगळंच बिघडतं. अशातच बबनची खट्याळ आणि अनपेक्षित एण्ट्री सगळ्या समीकरणांना वेगळं वळण देते. वेगवेगळ्या स्वभावांची चार माणसं एकत्र आली की काय धमाल होऊ शकते, याची मजेशीर झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
या सगळ्या गोंधळात अभिनेत्री रिंकू राजगुरूची एण्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. ती नेमकी कोण आहे, ती या तिघांच्या आयुष्यात का येते आणि तिच्या उपस्थितीमुळे सगळेच अस्वस्थ का होतात, याची थेट उत्तरं ट्रेलर देत नाही. त्यामुळे तिची भूमिका योगायोग आहे की एखाद्या मोठ्या वळणाची सुरुवात, याबाबत कुतूहल निर्माण होतं.
ट्रेलरमधील विनोदाचा वेग आणि टाइमिंग जबरदस्त आहे. अचूक संवाद, प्रसंगांची गंमत आणि कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे ट्रेलर एक क्षणही कंटाळवाणा वाटत नाही. बबनचा खोडकर स्वभाव, मदनची विनोदी शैली, चंदनची साधी निरागसता आणि रतनचा ताठरपणा—हा सगळा गोंधळच या चित्रपटाचा आत्मा ठरतो.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाले की, “‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट म्हणजे केवळ विनोद नव्हे, तर माणसांच्या स्वभावातून आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगांतून निर्माण होणाऱ्या गोंधळाची धमाल कथा आहे. ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या मजेपेक्षा अनेक पटींनी मोठा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटात मिळणार आहे.”
अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांसारख्या दिग्गज कलाकारांसह रिंकू राजगुरू या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच संजय नार्वेकर हे पाहुणे कलाकार म्हणून झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता हा गोंधळ मोठ्या पडद्यावर किती धमाल उडवतो, हे पाहणं नक्कीच मजेशीर ठरणार आहे.




