वार्षिक तपासणीसाठी आलेल्या आयुक्तांसाठी पोलीस बँड, विशेष तयारी; तामझामावर प्रश्नचिन्ह.
पुणे शहरातील परिमंडळ १ कार्यालयात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या भव्य तयारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रेड कार्पेट, पोलीस बँड, ड्रोनद्वारे शूटिंग आणि मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली सजावट यामुळे या स्वागताची शहरभर चर्चा सुरू झाली आहे.
माहितीनुसार, वार्षिक तपासणीसाठी आयुक्त परिमंडळ १ च्या कार्यालयात येणार असल्याने पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात आली होती. कार्यालयाबाहेर रेड कार्पेट अंथरण्यात आला होता, स्वागतासाठी पोलीस बँड सज्ज ठेवण्यात आला होता आणि कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी परिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना सकाळी सात वाजताच कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आयुक्त कार्यालयात दाखल होत असताना काही वेळ परिसरातील वाहतूकही थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या स्वागत सोहळ्याची चर्चा आणखी रंगली आहे. गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत करण्याची गरज होती का, असा प्रश्न आता काहींकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या बैठकीदरम्यान परिसरातील गुंडगिरी, अमली पदार्थांची तस्करी, बुधवार पेठ परिसरातील बांगलादेशी महिलांवर सुरू असलेल्या कारवाया, बेकायदेशीररीत्या राहणारे बांगलादेशी नागरिक तसेच शहरातील वाहतूक कोंडी यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी परिमंडळ १ पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात बांगलादेशी महिलांविरोधात सात कारवाया केल्या होत्या. या कारवाईचे शहरात कौतुकही झाले होते. मात्र त्या कारवाईपेक्षा आयुक्तांच्या स्वागताचा व्हिडीओच सध्या अधिक चर्चेत असल्याचे चित्र दिसत आहे.




