मुंबईतील दोन प्रभागात भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही (Pune) भाजपच्या तीन उमेदवारांना फटका बसला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena)मोठा धक्का बसला आहे. येथील प्रभाग 24 मधील भाजपच्या तीन जागेवरील आणि शिंदेंच्या शिवसेना पक्षातील दोन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे, आता येथील उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे.
शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रभागात युतीत स्वबळावर लढणाऱ्या दोन्ही पक्षांना हा मोठा फटका बसलाय. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे पाचही एबी फॉर्म जमा झाले होते. त्यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आजच्या छाननीमध्ये एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. आता, या जागेवर पाचही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. आता हे पाहता प्रभाग 24 मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकचं उमेदवार असेल तर शिंदे शिवसेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढतील. त्यामुळे, येथील भाजप आणि शिवसेना उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवावी लागणार असून पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे.




