1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना विक्री? फडणवीस यांनी गंभीरतेने घेतली दखल, उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुण्यातील मोठ्या जमीन व्यवहारावर गंभीर आरोप करत 1800 कोटी रुपयांची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे, तर या व्यवहारात मुद्रांक शुल्क म्हणून फक्त 500 रुपये भरल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दानवे यांनी असा आरोप केला आहे की, या खरेदीदरम्यान मूळ मालकांना विश्वासात घेतले गेले नाही तसेच जमिनीचा सातबारा उतारा देखील पूर्णपणे क्लिअर नव्हता. या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्डमधील सर्व माहिती मागवण्यात आली आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक तपासात समोर आलेले मुद्दे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि सर्व माहिती तपासल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील.
दरम्यान, पार्थ पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत सर्व आरोप फेटाळून लावत, “मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही,” असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवार उपस्थित असताना पत्रकारांनी या विषयावर त्यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. आता या वादावर अजित पवार नेमके काय म्हणतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




