पुण्यातील निलेश घायवळ गोळीबार प्रकरणानंतर नवे वादंग; त्याच्या भावाला दिलेल्या परवान्यावरून विरोधकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला आणखी वाचा फोडली ती म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी निलेशच्या भावाला, सचिन घायवळ (Sachin Ghaywal) याला दिलेल्या शस्त्र परवान्याने. या निर्णयावरून विरोधकांनी सरकारला जोरदार घेरले आहे.
योगेश कदम यांनी मात्र आपले समर्थन करताना सांगितले की, “परवाना देताना सचिन घायवळ याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नव्हते.” तरीसुद्धा विरोधक या उत्तरावर समाधानी नाहीत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी योगेश कदम यांच्यावर थेट हल्लाबोल करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “सचिन घायवळ यासाठी शिफारस कोणी केली? तुम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करत आहात का? आणि त्या व्यक्तीचं नाव घेण्याची हिंमत का होत नाही?” असा सवाल करत अंधारे यांनी कदम यांचा खुलासा करण्याची मागणी केली.
तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “गुंडांना बळ देणाऱ्या मंत्रीमंडळात बसणं हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे. जर सरकारला खरंच सुरक्षित पुणे हवं असेल, तर अशा मंत्र्यांना तत्काळ पदावरून हटवावं,” असं दमानिया म्हणाल्या.
निलेश घायवळवर अनेक गंभीर गुन्हे असतानाही त्याला पासपोर्ट कसा मिळाला, आणि त्याचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना कसा दिला. या दोन प्रश्नांमुळे राज्यातील राजकीय वातावरणात प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे.




