पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजगुरुनगर शहरात नुकत्याच घडलेल्या घटनेत भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून एका कुत्र्याचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच चाकण परिसरात अशाच हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही परिस्थितीत कोणताही सुधार न झाल्याचे या नव्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, विशेषतः लहान मुलांना बाहेर पाठवताना पालक धास्तावले आहेत. नगरपरिषदेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि वारंवार होणारे हल्ले यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.




