ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वृद्ध व्यक्तीचा खून करून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलीस स्टेशनच्या पथकाला मोठे यश मिळाले असून, या आरोपींकडून खून, दरोडा आणि जबरी चोरीसह एकूण पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कबीर उंबऱ्या काळे (वय २४, रा. पुणेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि एक विधीसंघर्षित बालक यांचा समावेश आहे. ही घटना थोरांदळे पाईनमळा येथे घडली होती. दामोदर जयराम मिंडे (वय ६२) हे त्यांच्या शेतातील घरात झोपलेले असताना आरोपींनी घरात घुसून त्यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज लुटून आरोपी फरार झाले. या प्रकरणी मृताच्या मुलीने मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन संशयित दिसून आल्याने तपासाची दिशा स्पष्ट झाली. आरोपींनी मोटारसायकलचा वापर करून घटनास्थळावरून पळ काढल्याचेही निष्पन्न झाले. सुमारे ६० किलोमीटर परिसरातील जवळपास १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पारनेर तालुक्यात सापळा रचून ५ एप्रिल २०२६ रोजी आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला ११ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी कबीर उंबऱ्या काळे याचेकडे सखोल चौकशी केली असता, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच आरोपीने सांगितलेप्रमाणे ओतूर पोलीस स्टेशन, घोडेगाव पोलीस स्टेशन, मंचर पोलीस स्टेशन, दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेले गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, पोसई अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, राजू मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, राहूल पवार, समाधान नाईकनवरे, सुजाता कदम, भाउसाहेब पुंड, अजय देडे मंचर पो स्टे चे सपोनि सुनिल बडगुजर, पोसई सनील धनवे, पोलीस अंमलदार संजय नाडेकर, हनुमंत ढोबळे, योगेश रोडे, सुनील काठे, अजित पवार यांनी केली आहे.




