गावठी पिस्तुल,जिवंत काडतूसांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव (Narayangaon) बस स्थानक परिसरात तिघांना गावठी पिस्तुल,नऊ काडतूसासह जेरबंद केले आहे.मोटार सायकलसह एकूण 1,75,000 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी दहशतवाद विरोधी शाखा, स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलीसांनी केली आहे.पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथक संयुक्तरित्या अवैध गावठी पिस्तुल तस्करी करणारे, बाळगणारे, खरेदी-विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी ओंकार शिंदे व मोसीन शेख यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नारायणगाव एस.टी.स्टँड परिसरात एका स्प्लेंडर मोटार सायकलवर तीन इसम संशयित रित्या फिरत असून, त्यांचे जवळ गावठी पिस्तुल आहेत. अशी बातमी मिळाल्याने पथकातील दहशतवाद विरोधी शाखेचे सपोनि प्रकाश पवार यांनी स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय माहिती दिली. स्था.गु.शा.चे पथकातील सपोनि महोदय शेलार यांनी दोन पंचांना बोलावून घेवून स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून नारायणगाव एस.टी. स्टैंड परिसरातून आरोपी नामे तीन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.(1) धनंजय चक्रधर साळुंखे, वय 20 वर्षे, रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे. (2) सुरज आप्पासाहेब कर्डीले, वय 18 वर्षे, रा.रामलिंग शिरूर ता शिरूर जि पुणे. (3) अनमोल दादाभाऊ जाधव, वय 27 वर्षे, रा.कारेगाव ता शिरूर जि पुणे अशी तिघा आरोपींची नावे असून, तीनही आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांचे अंगझडतीत प्रत्येकाजवळ अवैध रित्या बाळगलेली एकूण तीन गावठी पिस्तुल, नऊ जिवंत काडतूस व मोटार सायकल असा एकूण 1,75,000 रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
आरोपींचा अवैध गावठी पिस्तुल (Village pistol) खरेदी करण्यामागे आणि बाळगण्यामागे नेमका कोणता हेतू होता? याचा तपास सुरू आहे.पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सपोनि प्रकाश पवार, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, नारायणगाव पो स्टे चे सपोनि प्रविण सपांगे, पोसई जगदीश पाटील, स्था.गु.शा. व दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकातील अंमलदार विक्रम तापकीर, दिपक साबळे, मोसीन शेख, संदिप वारे, ओंकार शिंदे, गणेश चंदनशिव, हेमंत विरोळे, अक्षय नवले, रविंद्र जाधव, सुनील कोळी, संकेत जाधव, चेतन पाटील यांनी केली आहे.




