ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील धोलवड चौकात सुमारे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातात स्नेहल रोहिदास अहिनवे (वय 28, रा. ओतूर-अहिनवेवाडी) यांचा मृत्यू झाला. त्या त्यांच्या सासरे दत्तात्रय अहिनवे यांच्या दुचाकीवर मागे बसून जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या खाली पडून ट्रकखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सासऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्नेहल यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, ओतूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या महामार्गावर वेळोवेळी छोटे मोठे अपघात होत असतात झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.ओतूर बस स्थानक पासून दुतर्फा दोन किलो मीटर पर्यंत,दुभाजक बसवावेत तसेच वरचेवर अपघात होत असलेल्या ठिकाणी गतिरोधक किंवा जंकलर बसविण्यात यावेत आणि या भागात अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला असल्याने त्याची दुरूस्ती देखील तात्काळ करण्यात यावी जेणेकरून अपघात टाळता येऊ शकतील अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची आग्रही मागणी आहे.




