पुणे (Pune) शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. इथं एका भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. १४ ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शंतनू ऊर्फ बापू कांबळे असं हल्ला ३० वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो भाजप (BJP) च्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचे बंधू आहेत. घटनेच्या दिवशी शंतनू हा आपल्या नगरसेविका बहिणीचा फलक लावत होते. याच कारणातून त्यांना १४ ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना पुण्याच्या कासेवाडी परिसरात घडली आहे.
याप्रकरणी शंतनू कांबळे यांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तब्बल १४ ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये स्थानिक गुंडांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या भावावरच अशा प्रकारे भरचौकात हल्ला झाल्याने पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.




