खेड पोलीस स्टेशन हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून,घरातील कपाटे उचकटून व तोडून त्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने व टायटन कंपनीची घड्याळे असा एकूण ६८ लाख दोन हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे शाखा, व खेड पोलीसांनी उत्तर प्रदेश राज्यातून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ५५ तोळे सोन्याचे दागिने व ८३० ग्रॅम चांदी व गुन्ह्यातील कारसह ४७ लाख ८१ हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रिझवान निजामुद्दीन शेख वय ४२ वर्षे, व्यवसाय मजुरी सध्या रा. सरकरपूर थाना स्कुल ब्लॉक, दिल्ली, मुळ रा. फिरोजपूर बिजनौर, उत्तरप्रदेश असे आरोपीचे असे आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदार फरार असून,पोलीस त्यांचा शोध घेत आहे. याबाबत मोतीलाल कांतीलाल गदीया वय ५९ वर्षे धंदा- व्यापार व शेती रा.श्री आपर्टमेंट पाबळरोड, होलेवाडी राजगुरूनगर ता. खेड जि. पुणे यांनी राजगुरूनगर पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.
राजगुरू नगर येथील मोतीलाल कांतीलाल गदीया वय ५९ वर्षे धंदा- व्यापार व शेती रा.श्री आपर्टमेंट पाबळरोड, होलेवाडी राजगुरूनगर ता.खेड जि.पुणे हे दि.२ जानेवारी ते दि ३ जानेवारी रोजीच्या दरम्यान त्यांच्या घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मोतीलाल गदीया यांच्या राहाते घराचे दरवाज्याची कुलूपे कशाच्यातरी साहाय्याने तोडून,घरात प्रवेश करून घरातील कपाटे उचकटून व तोडून त्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने व टायटन कंपनीची घड्याळे असा एकुण ६८ लाख दोन हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरील प्रमाणे फिर्याद नोंद करण्यात आली आहे.
वर्षाच्या सुरूवातीलाच मोठ्या घरफोडीची घटना खेड शहरात भरवस्तीमध्ये घडली होती. घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरी गेला होता.पुणे (Pune) ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देवून, गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने बैठक घेवून मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करण्यात आली, घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्ह्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या कारचा सहभाग असून, वाहन नाशिक बाजूकडे गेले असल्याचे आढळून आले.सुमारे १२० किमी पर्यंत फुटेज तपासले असता, संशयित आरोपींचे फुटेज उपलब्ध झाले. आरोपींचे फुटेज हे गोपनीय बातमीदारांना देण्यात आले.
सदर गुन्ह्यात उत्तर भारतातील सराईत टोळी असून, ती टोळी चारचाकी वाहनाचा वापर करून,महाराष्ट्रात येतात आणि बंद घरांची घरफोडी चोरी करून, पुन्हा चारचाकी वाहनाने उत्तर भारतात निघुन जातात. अशी माहिती मिळाल्याने अशा गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब करणारे आरोपींची माहिती घेत असताना, गोपनीय बातमीदारांकडून पथकातील अंमलदार, दिपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांना माहिती मिळाली की, आंतरराज्यीय टोळीतील सराईत गुन्हेगार रिझवान निजामुद्दीन शेख सध्या रा.सरकरपूर थाना स्कूल ब्लॉक, दिल्ली, मुळ रा. फिरोजपूर विजनौर, उत्तरप्रदेश याने त्याचे साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाली,
स्था.गु.शा.चे पथकाने दिल्ली, उत्तर प्रदेश राज्यात जावून सलग सहा दिवस आरोपीचा शोध घेतला.आरोपी सराईत असल्याने तो वेळोवेळी ठावठिकाणा बदलून राहत होता, त्यामुळे आरोपी मिळून येण्यासाठी पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली. दरम्यान आरोपी रिझवान शेख हा गुजरात वरून मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळाली, त्या अनुषंगाने पथकाने त्याचा पाठलाग केला, आरोपी रिझवान शेख हा मुंबईहून पुण्यापर्यंत पोहोचला असल्याची माहिती मिळाल्याने, त्यास सापळा लावून पुणे-नाशिक हायवे रोडवर ताब्यात घेण्यात आले. आरोपी रिझवान निजामुद्दीन शेख वय ४२ वर्षे, व्यवसाय मजुरी सध्या रा. सरकरपूर थाना स्कुल ब्लॉक, दिल्ली, मुळ रा. फिरोजपूर बिजनौर, उत्तरप्रदेश यास ताव्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी कडून गुन्ह्यात गेले मालापैकी ५५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम वजनाची चांदी व गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची हुंदाई आय १० कार डीएल ३ सीबीआर ७३३६ असा एकूण ४७ लाख ८१ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यास दि. २२ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली होती, आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहे. सदर आरोपी रिझवान शेख याच्यावर यापुर्वी कोल्हापुर, पुणे, गुजरात, दिल्ली येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस स्टेशनचे पो.नि. सुभाष चव्हाण, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, पोसई अभिजीत सावंत, खेड पो स्टे चे पोसई महेश गरड, पोसई गोडगे, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, राजु मोमीन, अतुल डेरे, हेमंत विरोळे, मंगेश भगत, सागर नामदास, वाळासाहेव खडके, खेड पो.स्टे अंमलदार शंकर भवारी, संदीप लांडे, गोकूळ कोळी, सुरज राक्षे, प्रविण आढारी, बापू बिडकर, संकेत कवडे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुभाष चव्हाण हे करत आहेत.




