हार्मोनल संतुलन, चांगली झोप आणि तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त
भोपळ्याच्या बिया आपण अनेकदा स्वयंपाकघरात पाहतो, मात्र त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म फार कमी जणांना माहिती असतात. आहारतज्ज्ञांच्या मते, या छोट्या बिया महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात, विशेषतः ३० वर्षांनंतर.
महिलांच्या शरीरात मासिक पाळी, हार्मोनल बदल आणि मानसिक तणाव यामुळे अनेक अंतर्गत बदल होत असतात. या बदलांचा थेट परिणाम मूड, त्वचा, झोप आणि प्रजनन क्षमतेवर होतो. आहारतज्ज्ञ मनोल मेहता यांच्या मते, महिलांनी दररोज फक्त १ ते २ चमचे भोपळ्याच्या बिया आपल्या आहारात समाविष्ट केल्यास शरीरातील अनेक समस्या नैसर्गिकरित्या संतुलित राहू शकतात.
महिलांसाठी भोपळ्याच्या बियांचे प्रमुख फायदे
नैसर्गिक झिंकचा उत्तम स्रोत
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात असते. हे खनिज महिलांमध्ये ओव्हुलेशन, अंडी गुणवत्ता आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन संतुलित ठेवण्यास मदत करते. झिंकची कमतरता प्रजनन समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
हार्मोनल संतुलनास मदत
या बिया इस्ट्रोजेन हार्मोन नियंत्रित ठेवण्यास सहाय्य करतात. त्यामुळे पीएमएस, मूड स्विंग, चिडचिड आणि त्वचेवरील पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते.
निरोगी त्वचा आणि मजबूत केस
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेतील जळजळ कमी करतात, कोलेजन निर्मिती वाढवतात आणि केसांची वाढ सुधारतात.
तणाव आणि थकवा कमी होतो
मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो. मासिक पाळीतील पेटके, मानसिक तणाव आणि दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात.
शांत झोपेसाठी फायदेशीर
भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल असते, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या झोपेच्या हार्मोन्सच्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
भोपळ्याच्या बिया कशा खाव्यात?
सॅलड, ब्रेड किंवा लाडूंवर भुरभुरा
स्मूदी किंवा सूपमध्ये मिसळून
ओट्स, पोहे किंवा भाजलेल्या स्नॅक्समध्ये
सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा चावून खाऊ शकता




