जास्त पाणी, घाण अडलेली नोजल आणि जुना गॅस्केट हा त्रासाचं मूळ; काही घरगुती उपायांनी मिळेल कायमचा दिलासा
ऑफिसमधून घरी परतल्यानंतर पटकन स्वयंपाक उरकण्यासाठी अनेक महिला प्रेशर कुकरचा आधार घेतात. कारण डाळ, भात, भाज्या किंवा कोणताही पदार्थ कमी वेळात शिजवण्यासाठी प्रेशर कुकरच सर्वात सोयीचा मार्ग ठरतो. पण कुकरची शिट्टी वाजायला लागली की त्यातून पाणी बाहेर सांडू लागण्याची समस्या अनेकांना येते. ओट्यावर पाणी वाहू लागतं आणि स्वयंपाकघर मुळामुळं ओलसर होतं. पण हा त्रास काही साध्या उपायांनी सहज थांबवता येतो.
कुकरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाणी टाकलं तर उकळताना ते वर येऊन बाहेर सांडू लागतं. तसेच भाताचे दाणे, डाळ, किंवा बीन्सचे तुकडे व्हिसलच्या नोजलमध्ये अडकले तर वाफेला मार्ग मिळत नाही आणि दाब वाढताना पाणी बाजूला सांडतं.
हा त्रास टाळण्यासाठी गॅसची आच कायम मध्यम किंवा मंद ठेवा. आच खूप मोठी असल्यास कुकरमध्ये त्वरीत दाब तयार होतो आणि पाणीही अधिक वेगाने बाहेर येतं. याशिवाय, कुकरचं रबर गॅस्केट सहा महिन्यांनी एकदा बदलणं गरजेचं आहे. जुना गॅस्केट सैल झाल्यास सील नीट राहत नाही आणि गळती वाढते.
व्हिसल नोजलही स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं. प्रत्येक वापरानंतर टूथपिक किंवा बारीक ब्रशने नोजल साफ केल्यास घाण अडकत नाही आणि वाफेचा मार्ग मोकळा राहतो. काही वेळा रबर सैल झाल्यानेही पाणी बाहेर पडू लागतं, त्यामुळे झाकणावरील रबरची नियमित तपासणी करणं आवश्यक आहे.
कुकर खूप जुना असेल तर त्याचा तळ वाकल्यामुळे सील व्यवस्थित बसत नाही. अशा स्थितीत नवीन कुकर घेणं हाच उत्तम उपाय ठरतो. जर कुकरमधून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर यायला लागलं तर गॅसची आच ताबडतोब कमी करा, पण प्रेशर कमी होईपर्यंत व्हिसल हाताळू नका. दाब कमी झाल्यावरच तपासणी करा.




