ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharemendra) रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी नुकतीच समोर आली असतानाच, आणखी एक दिग्गज अभिनेता प्रेम चोप्रा (Prem Chpora) यांनाही तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
छातीत वेदना जाणवल्याने प्रेम चोप्रा यांना 8 नोव्हेंबर रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, शनिवारी त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
सुमारे चार दशकांच्या यशस्वी कारकिर्दीत, ‘प्रेम नगर’, ‘उपकार’, ‘बॉबी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम जिंकले. त्यांच्या खलनायकी भूमिकांनी भारताबाहेरही त्यांची लोकप्रियता वाढवली. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी असा खुलासा केला होता की, फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांच्या ‘द गॉडफादर’ला आदरांजली देणाऱ्या एका हॉलिवूड प्रकल्पात त्यांना गॉडफादरची भूमिका ऑफर करण्यात आली होती.
प्रेम चोप्रा यांनी 60 वर्षांच्या प्रवासात 350 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले असून, 2023 मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
दरम्यान, अभिनेता धर्मेंद्र यांनाही फॉलो-अप उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला असून, ते आता घरीच उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांपर्यंत पोहोचवली.




