मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या हेअरस्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. लग्नानंतर तिने आपला लूक पूर्णपणे बदलला असून स्ट्रेट हेअरकटसह फ्रंट फ्रिंज ठेवली आहे. तिच्या या हटके अंदाजाचे काही चाहत्यांनी कौतुक केले, तर अनेकांनी तीव्र टीका करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
काही नेटकऱ्यांनी तिच्या हेअरकटची खिल्ली उडवत नकारात्मक कमेंट्स केल्या. “हे काय आहे, कोंबडीच्या पिसांसारखं दिसतंय,” अशा शब्दांत काहींनी प्रतिक्रिया दिली. मात्र, या टीकेदरम्यान एक कमेंट विशेष लक्षवेधी ठरली. ओम यादव नावाच्या व्यक्तीने स्वतःला प्राजक्ताचा भाऊ असल्याचे सांगत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले. ओम यादव यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, प्राजक्ताने ही हेअरस्टाईल स्वतःच्या इच्छेने नाही तर आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिग्दर्शकाच्या विनंतीनुसार ठेवली आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक निवडीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
प्राजक्ताने यापूर्वी लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजी मध्ये येसूबाईंची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात तिच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. नव्या लूकमध्ये तिला पाहून काही जणांना धक्का बसला असला तरी तिच्या व्यावसायिक आयुष्याचा आदर ठेवावा, असे तिच्या भावाने आवाहन केले. त्यांनी पुढे सांगितले की चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून काही महिन्यांत तिचे केस पुन्हा वाढतील. ट्रोलिंग ही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना नवीन बाब नसली तरी अनावश्यक टीका टाळावी आणि कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचाही विचार करावा, असे आवर्जून सांगत त्यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. दरम्यान, प्राजक्ताच्या नव्या लूकबाबत चर्चा सुरू असली तरी तिच्या आगामी प्रोजेक्टकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.




