spot_img

Pockets & Patriarchy : पुरुष प्रधान समाजाने महिलांना नाकारले खिसे; विषय वाटतो तितका साधा नाही!

spot_img

3 जानेवारी रोजी राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले (Savitribai Phule) यांची 195 वी जयंती आहे. याचनिमित्ताने आपण महिलांच्या संदर्भातील एका वेगळ्या परंतु महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महिला आणि शॉपिंग यांचं एक अतूट नातं आहे असं आपण नेहमी म्हणतो. शॉपिंग म्हटलं की कपडे आलेच, पण त्यासोबत महत्त्वाची असते ती म्हणजे ‘हँडबॅग’ किंवा ‘पर्स’. कधी विचार केलाय का की, महिलांना ही पर्स खांद्यावर का वागवावी लागते? का त्यांना पुरुषांप्रमाणे आपले पैसे, फोन किंवा ओळखपत्र सहज खिशात टाकता येत नाही? तुम्हाला वाटेल की, ‘खिसे असणं किंवा नसणं ही काय मोठी गोष्ट आहे?’ पण ही साधी गोष्ट नाहीये. हा फक्त फॅशनचा विषय नसून यामागे शेकडो वर्षांचा इतिहास, पुरुषप्रधान संस्कृती आणि महिलांच्या अधिकारांचा मोठा संघर्ष लपलेला आहे.

जरा पुरुषांच्या कपड्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या शर्टला खिसा, पँटला तर चार खिसे, जॅकेटला खिसे… जणू काही पुरुष म्हणजे चालतं-बोलतं कपाटच! पुरुष आपल्या खिशात प्रामुख्याने तीन गोष्टी ठेवतात: पैसे अर्थात संपत्ती, पेन म्हणजे शिक्षण/विचार आणि ओळखपत्र अर्थात त्यांची स्वतःची ओळख. पण महिलांच्या बाबतीत चित्र वेगळं आहे. साडी असो, ड्रेस असो किंवा पारंपारिक गाऊन, तिथे खिशाला स्थान नसतं. का? कारण ऐतिहासिकदृष्ट्या महिलांना या तिन्ही गोष्टींपासून दूर ठेवलं गेलं होतं. जेव्हा तुमच्याकडे स्वतःची संपत्ती नसते, जेव्हा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नसतो आणि जेव्हा तुमची ओळख फक्त ‘कोणाची तरी पत्नी किंवा मुलगी’ अशी असते, तेव्हा तुम्हाला खिसा कशासाठी हवा?”

17 व्या शतकात परिस्थिती वेगळी होती. तेव्हा महिलांच्या कपड्यांच्या आत एक स्वतंत्र पिशवी (Detachable Pocket) असायची, जी कंबरेला बांधली जात असे. पण जसजसा काळ बदलला, तसतशी फॅशन बदलली. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये कपड्यांची पद्धत बदलली. महिलांचे कपडे शरीराला चिटकून राहणारे बनू लागले. जर त्या कपड्यांच्या आत खिसा ठेवला, तर महिलांची Figure खराब दिसेल, असा तर्क फॅशन डिझाइनर्सनी दिला. परिणामी, कपड्यांच्या आतली पिशवी गायब झाली. याचाच अर्थ असा की, महिलेची ‘उपयोगिता’ पाहण्यापेक्षा ती ‘सुंदर’ कशी दिसेल, याला महत्त्व दिलं गेलं. महिलांनी स्वतःच्या वस्तू स्वतःजवळ ठेवण्याऐवजी त्या घरच्या पुरुषाकडे द्याव्यात, अशी ही एक अप्रत्यक्ष गुलामगिरीच होती.

जेव्हा कपड्यांमधून खिसे काढून टाकले गेले, तेव्हा महिलांची गरज भागवण्यासाठी ‘रिटिक्युल’ नावाच्या छोट्या पिशव्या बाजारात आल्या. आज ज्याला आपण ‘पर्स’ किंवा ‘हँडबॅग’ म्हणतो, ती खरं तर महिलांच्या कपड्यांना खिसे नसल्यामुळे निर्माण झालेली गरज होती. पण इथेही एक मार्केटिंगचा डाव होता. कपड्यांना खिसे दिले तर पर्स विकल्या कशा जाणार? आज हँडबॅग इंडस्ट्री ही अब्जावधी डॉलर्सची आहे. ‘लक्झरी ब्रँड्स’ना हे कधीच परवडणार नाही की महिलांच्या कपड्यांना मोठे आणि उपयुक्त खिसे असावेत. कारण तसं झालं तर त्यांची महागडी बॅग घेणार कोण?”

आज आधुनिक काळात महिला जीन्स आणि पँट घालतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? एका संशोधनानुसार, महिलांच्या जीन्सचे खिसे पुरुषांच्या तुलनेत 48% लहान असतात आणि 40% कमी खोल असतात. अनेकदा तर महिलांच्या पँटला ‘फेक पॉकेट्स’ असतात. म्हणजे फक्त खिशाची डिझाईन असते, पण त्यात काही ठेवता येत नाही. का? कारण आजही फॅशन इंडस्ट्रीला वाटतं की खिसा मोठा असेल तर महिलांचे ‘कर्व्हज’ नीट दिसणार नाहीत. विचार करा, एका माणसाची सोय महत्त्वाची की त्याने कसं दिसावं हे महत्त्वाचं?”

हा लढा केवळ खिशांचा नाहीये, तर तो स्वातंत्र्याचा आहे. 19 व्या शतकाच्या शेवटी ‘रॅशनल ड्रेस रिफॉर्म’ नावाची चळवळ झाली होती. महिलांनी मागणी केली होती की त्यांनाही पुरुषांप्रमाणे आरामदायी आणि खिसे असलेले कपडे मिळावेत. जेव्हा एखादी महिला घराबाहेर पडते, तेव्हा तिला आर्थिक स्वावलंबनासाठी पाकीट जवळ ठेवणं गरजेचं असतं. खिशात हात घालून निर्भयपणे चालणारा पुरुष आणि एका हातात जड बॅग सावरत चालणारी महिला, या चित्रातच सत्तेचं असमान वाटप दिसतं. स्वतःची ओळख खिशात असणं म्हणजे स्वतःवरचा विश्वास असणं आहे.

तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी पर्स खरेदी कराल किंवा एखाद्या ड्रेसला खिसा नाही म्हणून चिडाल, तेव्हा लक्षात घ्या की हा केवळ डिझाईनचा दोष नाही. ही एक शतकानुशतके चालत आलेली व्यवस्था आहे. आज अनेक ‘वुमन-लेड’ ब्रँड्स महिलांच्या सोयीसाठी मोठे खिसे असलेले कपडे बनवत आहेत. ‘पॉकेट्स फॉर विमेन’ ही आता केवळ फॅशन नसून एक हक्क बनत चालली आहे. महिलांच्या कपड्यांना खिसे असणं खरोखरच त्यांच्या सक्षमीकरणाचं लक्षण आहे का?

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ