गुवाहाटीतून पंतप्रधान मोदी करणार निधी वितरण; केंद्राकडून 18,640 कोटी रुपयांची तरतूद.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा 22 वा हप्ता आज काही तासांत त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी आसामची राजधानी गुवाहाटी येथून देशभरातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. या योजनेला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत.
22 व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास मंत्रालयाकडून सुमारे 18 हजार 640 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. या निधी वितरणाचा कार्यक्रम 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.
याआधी पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता 22 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.
महाराष्ट्रातील लाभार्थी किती?
पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या 1 जानेवारी 2026 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 90 लाख 73 हजार 678 शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. आज निधी वितरण झाल्यानंतर प्रत्यक्षात राज्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली याची स्पष्ट माहिती पुढे समोर येणार आहे.
दरम्यान, केंद्राच्या पीएम किसान योजनेप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सातवा हप्ता 9 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता.
राज्यात सुमारे 91 लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 संपण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने पुढील हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 6 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. केंद्र सरकारने ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केली होती.




