उन्हात गरम झालेलं पाणी दिसतं स्वच्छ, पण आत दडलेला असतो मोठा धोका
आजच्या वेगवान जीवनशैलीत अनेकदा आपण लहानसहान सवयींकडे दुर्लक्ष करतो, पण ह्याच सवयी पुढे गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. त्यापैकी एक महत्त्वाची पण दुर्लक्षित बाब म्हणजे कारमध्ये ठेवलेली पाण्याची बाटली. प्रवासादरम्यान आपण गाडीत पाणी ठेवतो आणि अनेकदा तेच पाणी दिवसन्दिवस तिथे राहते. नंतर तहान लागली की पाणी स्वच्छ दिसत असल्यामुळे आपण ते न विचार करता पितो. मात्र, कारमध्ये ठेवलेले पाणी खरंच सुरक्षित असते का, हा प्रश्न विचारात घेणे गरजेचे आहे.
विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा कार दीर्घकाळ उन्हात उभी असते, तेव्हा गाडीच्या आतले तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. काही वेळा हे तापमान 60 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेले पाणी हळूहळू आरोग्यास अपायकारक बनू शकते, असा इशारा डॉक्टर देतात. पाणी चवीनं किंवा वासानं खराब वाटत नसले तरी त्यात घातक रसायने मिसळलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तज्ज्ञांच्या मते, पाणी खराब होण्यापेक्षा ते ठेवलेली प्लास्टिकची बाटली जास्त धोकादायक ठरते. उष्णतेमुळे प्लास्टिकची रचना कमकुवत होते आणि त्यातील रसायने पाण्यात झिरपू लागतात. जर कार उन्हात उभी असेल आणि पाण्याची बाटली एक-दोन दिवस आत ठेवलेली असेल, तर ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. अनेक दिवस जुने पाणी तर आरोग्यासाठी अधिकच घातक ठरू शकते.
याशिवाय अर्धवट पाणी पिऊन बाटली कारमध्येच ठेवणे ही मोठी चूक असल्याचे डॉक्टर सांगतात. बाटलीच्या तोंडातून गेलेले जंतू गरम वातावरणात झपाट्याने वाढतात. त्यामुळे पाणी शिळे होते आणि पोटाच्या विविध तक्रारी उद्भवू शकतात. डोकेदुखी, पोटदुखी, जुलाब, घशात खवखव, थकवा तसेच दीर्घकाळात हार्मोनल असंतुलन यांसारखे त्रास होऊ शकतात. लहान मुले, वृद्ध आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांसाठी हा धोका अधिक गंभीर ठरतो.
अनेकांना असे वाटते की सीलबंद मिनरल वॉटरची बाटली सुरक्षित असते. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही ब्रँडची बाटली असली तरी ती प्लास्टिकचीच असते. गरम वातावरणात प्रत्येक प्लास्टिकमधून रसायने बाहेर पडण्याचा धोका असतो. त्यामुळे गाडीमध्ये तासन्तास किंवा दिवसन्दिवस ठेवलेले मिनरल वॉटरही पिणे टाळले पाहिजे.
कारमध्ये पाणी ठेवताना घ्यावयाची काळजी:
– प्लास्टिकऐवजी स्टील किंवा काचेची बाटली वापरा
– दररोज ताजे पाणी भरून घ्या
– रात्री किंवा अनेक दिवस गाडीत पाण्याची बाटली ठेवू नका
– उन्हात उभी असलेल्या कारमधून बाटली बाहेर काढा
– अर्धवट वापरलेली बाटली पुन्हा पिण्यास वापरू नका
या छोट्या सवयी अंगीकारल्यास मोठ्या आरोग्य समस्यांपासून स्वतःचा बचाव करता येईल.




