spot_img

Phaltan Doctor Suicide news : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमागे माजी खासदाराचा दबाव?

spot_img

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप; महिला अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका तरुण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दानवे यांनी शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मृत डॉक्टर तरुणीने आपल्या सुसाइड नोटमध्ये माजी खासदाराच्या दोन स्वीय सहाय्यकांनी तिच्यावर दबाव टाकल्याचा उल्लेख केला आहे. या सहाय्यकांनी तिचे रणजितसिंह यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक दबावात आली आणि तिने आत्महत्या केली.दानवे यांनी पुढे सांगितले की, राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक हे माजी खासदारांचे स्वीय सहाय्यक असून, त्यांनीच हा प्रकार घडवून आणला. याशिवाय, पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने तसेच माजी खासदारांचा कथित दलाल असलेल्या डीवायएसपी महाडिक यानेही तरुणीला तिच्या बीडच्या मूळ गावावरून हिणवल्याचा आरोप आहे.

महाडिक हा अधिकारी नुकताच बढती मिळाल्याने नंदूरबारला गेला आहे. दानवे यांनी या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करण्याची आणि महाडिक याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी साताऱ्याबाहेरील महिला अधिकाऱ्यांकडून करावी, असेही त्यांनी सुचवले.या प्रकरणातून पोलिसांवर आणि राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांवर येणारा दबावही समोर आला आहे. पोस्टमार्टेम अहवाल बदलणे किंवा कैद्यांना फिट/अनफिट प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टरांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा दानवे यांनी केला. ते म्हणाले, “ही सत्तेची मस्ती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यातील अधिकारी अशा पद्धतीने प्रामाणिक डॉक्टरांशी वागतात, हे लज्जास्पद आहे.”याशिवाय, दानवे यांनी माजी खासदारांचे भाऊ अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यावरही शेतकऱ्यांविरुद्ध खोट्या उत्खनन प्रकरणात १ कोटी रुपयांचा बोजा चढवल्याचा आरोप केला. वाठार निंबाळकर आणि वाखरी गावातील शेतकऱ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने लक्ष्य केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.या प्रकरणाने सातारा जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, याबाबत पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ